मुख्य अंक पान ३
-------------
अनुदानित आश्रमशाळेत रोस्टर तपासणी
------------
आदिवासी विकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ५ जुलैचा अल्टिमेटम
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांच्या रोस्टर पडताळणीसाठी ५ जुलैपर्यंत मुदत आहे. १० जुलैपर्यंत मागासवर्गीय कक्ष येथे बिंदूनामावली (रोस्टर) मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ती भरण्यापूर्वी बिंदूनामावलीची पडताळणी करून ती अद्ययावत करणे कायदेशीररीत्या आवश्यक असते. याबाबत आदिवासी विकास आयुक्तस्तरावरून यापूर्वीच नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री डॉ. उईके यांनी अनुदानित आश्रमशाळा रोस्टर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. अनुदानित आश्रमशाळा रोस्टर पडताळणी मोहिमेची जबाबदारी अपर आयुक्त कार्यालयांवर असणार आहे. कार्यवाहीचा अहवाल तातडीने आदिवासी विकास आयुक्तालयाला सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. उईके यांनी दिले आहेत.
...
१६-१
विशेष शिबिराचे आयोजन
अनुदानित आश्रमशाळांचे बिंदूनामावली अर्थात, रोस्टर अद्ययावत करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयस्तरावरून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून रोस्टर पडताळणी व इतर अनुषांगिक कामांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे रोस्टर पडताळणी विहित मुदतीत पूर्ण होणार आहे.
--------------------
कोट
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ५५८ अनुदानित आश्रमशाळा आहेत. भरतीप्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि आरक्षण नियमांचे पालन करून होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांच्या रोस्टर पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
----------------