NSK26H22568
जळगाव : मोहरमनिमित्त बनविण्यात आलेल्या ताजियाचे दर्शन घेताना भाविक.
---
भक्ती, प्रार्थना अन् बंधुत्वात यौमे आशुरा साजरा
मुस्लिम बांधवांतर्फे''विशेष नमाज, ताजियाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : मुस्लिम समाजाचा पवित्र धार्मिक दिवस यौमे आशुरा शुक्रवारी (ता. २६) जळगावात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज, कुरआन पठण आणि सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. देशात शांतता, सर्वांवर ईश्वराची कृपा राहावी, भरपूर पाऊस पडावा तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांपासून संरक्षण मिळावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
सकाळी आठ ते दहा या वेळेत भिलपुरा येथील सुन्नी जामा मशिदीसह शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज-ए-आशुरा अदा करण्यात आली. त्यानंतर विशेष प्रार्थना, हम्द, सना, नात आणि मनकबत सादर करण्यात आले. कुरआन पठण व फातेहा झाल्यानंतर समाजाच्या सुख-समृद्धीसाठी आणि देशात शांततेचे वातावरण कायम राहावे, यासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. यावेळी सुन्नी जामा मशीद भिलपुरा व सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा अमजदी, मौलाना फिरदौस रजा, हाजी सत्तार शेख, हाजी गुलाम रसूल, हाजी शकूर बादशाह, हाजी नासिर अली, हाजी शेख सिराजुद्दीन, इम्रान खान, जलालुद्दीन शेख, जावेद अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पारंपरिक खाद्यपदार्थ
यौमे आशुरा (मोहरम) निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरांमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. दलिया, दही चोंगा, हलवा, गोड भात, नानखटाई तसेच दूध व सुका मेवा यांचे मिश्रण असलेले सबिल तयार करून कुटुंबीयांनी त्याचा आस्वाद घेतला. शहरातील विविध चौक, गल्ली आणि रस्त्यांवर उभारलेल्या सबिलमधून नागरिकांना शीतपेयाचे मोफत वाटप करण्यात आले.
''
चौकट
ताजिया दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मोहरमनिमित्त गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात सवारी काढण्यात आल्या. तसेच शुक्रवारी भिलपुरा आणि सुभाष चौक परिसरात आकर्षक ताजिया उभारण्यात आले होते. तसेच सायंकाळी निघालेल्या मिरवणुका व ताजियाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती.