दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा ऊन
(उपशीर्षक)
जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यानंतर पावसाने ब्रेक घेताच पुन्हा कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सकाळी काहीसे ढगाळ वातावरण असताना दुपारी मात्र कडक ऊन पडत आहे. दरम्यान, पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
पंधरा दिवस उशिराने मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते. जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर पावसामुळे काही काळ दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारपासून (ता.२५) पुन्हा पाऊस गायब झाला आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असल्याने अचानक वाढलेल्या उन्हामुळे वातावरणात दमटपणा वाढला आहे. काही भागात दमदार पाऊस झाला असून काही भागात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
चौकट
पेरण्यांची लगबग
जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाचे २२ जूनला आगमन झाले. यानंतर २२ व २३ जून असा दोन दिवस चांगला पाऊस झाला. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. तर काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाली होती. बळीराजा पेरणीच्या कामाला लागला आहे. आता दोन झाले पाऊस नसला तरी देखील बळीराजा पेरणीचे काम लगबगीने करत असल्याचे दिसून येत आहे.