मेन
युद्धामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ
गणेशोत्सवावर महागाईचे सावट; उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढ अपरिहार्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी, त्याच्या तयारीला मे महिन्यापासून सुरुवात होते. इराण, इस्रायल व अमेरिका देशांतर्गत युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. या युद्धाची झळ आगामी काळातील सणांना बसणार असून श्रीगणेश मूर्ती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. भक्तांना दोन हजार रुपयांची मूर्ती घ्यावयाची झाल्यास त्यासाठी २५०० ते २६०० रुपये माेजावे लागणार आहेत.
यंदा १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान सलग बारा दिवस गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे उत्सवाबरोबर महागाईचे आगमन होणार आहे. राज्यातील अनेक भागांत गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, मजुरी, वाढलेल्या इंधन खर्चामुळे वाहतुकीचा व पॅकिंग खर्चामुळे मूर्तींच्या दरात वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), रंग, वार्निश आणि सजावटीचे साहित्य गेल्या वर्षाच्या तुलनेत महागले आहे. मूर्ती घडविणारा कलाकार पूर्वी तीनशे, तर आता सातशे व स्मार्ट काम करणारा कलाकार हजार रुपये रोजाने काम करतो. हा हंगामी रोजगार असल्याने कलाकारांची संख्या कमी होत आहे. पॅकिंग साहित्य, गोदाम भाडे आणि इतर पूरक खर्चाचाही थेट परिणाम मूर्तींच्या किमतीवर झाला आहे. मूर्ती वाळविण्यासाठी हीटरचा उपयोग केला जाताे. त्यासाठी गॅसची टाकी लागते. पूर्वी गॅसची टाकी तीनशे रुपयांना मिळत होती आता नऊशे रुपये मोजावे लागतात. मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार, उत्पादन खर्च वाढल्यामुळे दरवाढ अपरिहार्य आहे. दर वाढले असले तरी, त्यातून नफ्यात विशेष वाढ झालेली नाही. वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी मूर्तींच्या किमती वाढवाव्या लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---
दरवाढीचे कारणे
-शाडू माती, पीओपी आणि रंगांच्या किमतीत वाढ
-सजावटीच्या साहित्याचा वाढलेला खर्च
-इंधन दरवाढीमुळे आयात-निर्यात महाग
-पॅकिंग आणि साठवणीच्या खर्चात वाढ
-काही आयात साहित्य महागल्याचा परिणाम
-टोल वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो
-- कोट
शाडू मातीपासून हाताने मूर्ती घडविणारे शिल्पकार आता राहिलेले नाही. सरळ मोल्ड वापरून मूर्ती बनवित असल्याने पूर्वीसारखी मजा आता राहिलेली नाही. शिवाय मूर्ती बनविण्यासाठी येणारा खर्चही ग्राहकांवर लादला जातो.
-प्रसन्न तांबट, मूर्तिकार
-------