मुख्य अंक पान ३ साठी
-------------
३०-२
मतदारयादी पुनरीक्षणासाठी
राष्ट्रवादीचा जिल्हाभर जागर
जिल्हाध्यक्ष खैरे यांचा २८ जूनपासून दौरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ ः मतदार विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे २८ जूनपासून पुढील आठ दिवस जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात २८ जूनला होणार असून, सकाळी अकराला पिंपळगाव येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि दुपारी तीनला अवनखेड (ता. दिंडोरी) येथील विघ्नेश्वर लॉन्समध्ये कार्यकर्ता बैठक घेण्यात येईल. मतदारयादीतील त्रुटी दूर करणे, पात्र नवमतदारांची नोंदणी, दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे, पत्ते दुरुस्ती यांसारख्या बाबींवर या मोहिमेत भर दिला जाणार आहे.
जिल्हाध्यक्ष खैरे स्वतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका व शहर पातळीवर बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे प्रमुख, आघाड्यांचे पदाधिकारी व बूथ कमिटी सदस्यांना या मोहिमेची उद्दिष्टे व कार्यपद्धती समजावून सांगितली जाणार आहे. बूथस्तरावरील संघटन बळकट करणे, पक्षाची भूमिका घराघरांत पोहोचवणे आणि मतदार पुनरीक्षण मोहिमेला गती देणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे खैरे यांनी सांगितले. ‘प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत असले पाहिजे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. या दौऱ्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
--------------------