धुळे टुडे २ साठी मेन...
---
‘पे ॲन्ड पार्क’साठी तीन जागांचा प्रस्ताव
---
शहरातील पार्कींग समस्या सोडविसाठी मनपाचा प्रयत्न; कार्यवाहीला गती देण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : शहरात वाहनांच्या पार्कींगची व पर्यायाने वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी धुळे महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत ‘पे ॲन्ड पार्क’च्या विषयाला मंजूरी देण्यात आली. यासाठी शहर अभियंत्यांकडून तीन जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या जागा किती उपयोगी ठरतील व त्या सर्वमान्य होतील का यावर या ‘पे ॲन्ड पार्क’ प्रयोगाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, यानिमित्ताने पार्कींग व वाहतूक कोंडीच्या समस्येवर काहीतरी कार्यवाही सुरू झाली हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल.
-------------
धुळे शहरात दुचाकींसह चारचाकी वाहनांना पार्कींगसाठी कुठेही अधिकृत जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक जेथे कामासाठी जातील तेथे त्यांना आपापली वाहने उभी करावी लागतात. पेठ भाग व शहरातील इतर व्यावसायिक भागात त्यातून वाहतूक कोंडी होते, अनेकदा त्यावरुन नागरिकांमध्ये वाद, भांडणे होतात. अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळते. धुळ्यात वाहने उभी करण्यासाठी कुणालाही शिस्त नाही असे चित्र पाहायला मिळते. शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे ही समस्या अधीकच गंभीर बनत चालली आहे. संबंधित यंत्रणांकडून यावर गांभीर्यपूर्वक कार्यवाही होत नाही. दरम्यान, आता धुळे महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. पार्कींग व वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपायासह महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापौरांच्या निर्देशानुसार महापालिका मालकीच्या उपलब्ध जागांवर ‘पे ॲन्ड पार्क’ सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत ठेवण्यात आला, हा प्रस्ताव मंजूरही झाला.
तीन जागांचा प्रस्ताव
पे ॲन्ड पार्कींसाठी महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी तीन जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात बारापत्थर येथील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे अस्तित्वातील पार्किंगची जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. तसेच, पारोळा रोडवरील आर. आर. पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स येथेदेखील अस्तित्वातील पार्किंगची जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिसरी जागेचा प्रस्ताव धुळे महापालिका जुनी प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेचा आहे. या तीनही ठिकाणी ‘पे ॲन्ड पार्क’ची सुविधा सुरू केल्यास वाहन पार्किंगचे शिस्तबद्ध नियोजन होईल, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील. तसेच, धुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.
निविदा काढणार
‘पे ॲन्ड पार्क’ची सुविधा उपलब्ध करुन ती चालविण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने याकामी निविदा काढून ते काम निविदाधारकाला देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे हे काम खासगी संस्था, ठेकेदाराकडे जाणार आहे. पर्याय काहीही असोत पार्कींग समस्या सोडविण्यासाठी धुळे महापालिकेकडून किमान प्रयत्न तरी सुरू झाले हेही कमी नाही. आता यावर गतीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा असणार आहे.
---