स्वतंत्र जिल्हा रेशीम
कार्यालय जळगावला मंजूर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बुधवारी (ता.२४) यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. सध्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या चारही जिल्ह्यांचे कामकाज नाशिक जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत पाहिले जाते. मात्र, या कार्यालयावर कामाचा मोठा ताण होता आणि मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याने रेशीम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात अडचणी येत होत्या. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत तुती लागवड आणि रेशीम कोष उत्पादनात वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात वस्त्रोद्योग विभागाने जळगावसाठी स्वतंत्र कार्यालयाचा पाठपुरावा केला होता. नवीन कार्यालयाच्या कामकाजासाठी एकूण १० पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ८ पदे नियमित स्वरूपाची तर २ पदे बाह्ययंत्रणेद्वारे (कंत्राटी पद्धतीने) भरली जाणार आहेत. नवीन पदनिर्मिती आणि जळगाव जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाची पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आदेश नागपूरच्या रेशीम संचालनालयाच्या संचालकांना देण्यात आले आहेत.