धुळे ः टुडे ३ साठी
--
लोगो छायाचित्र ः मनपा इमारत घेणे
--
महापालिका १३ कोटी वसूल करणार
-
राजर्षी शाहू नाट्यमंदिराच्या अनधिकृत वापरापोटी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : महापालिका क्षेत्रातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिर या शासकीय मालमत्तेचा तब्बल १२ वर्षे अनधिकृतपणे वापर केल्याप्रकरणी प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले आहे. नाट्यगृहाचा बेकायदेशीर ताबा ठेवून आर्थिक लाभ उठवल्याप्रकरणी वापरकर्ते राजेंद्र भावसार यांच्याकडून तब्बल १३ कोटी ४५ लाख ३६ हजार ८२८ रुपये वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबत महापालिकेच्या महासभेत बुधवारी (ता. २४) ठराव मंजूर झाला.
-
राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातील मे. श्रीकृष्ण खांडसरी शुगर मिल्सला (तळोदा) २०१० मधील आदेशान्वये १७ जानेवारी २०१३ पर्यंतच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, हा करार संपुष्टात आल्यानंतरही १८ जानेवारी २०१३ पासून ते महापालिकेने नाट्यगृह प्रत्यक्षात ताब्यात घेईपर्यंत म्हणजेच २१ डिसेंबर २०२५ पर्यंत तब्बल १२ वर्षे या जागेचा बेकायदेशीर व अनधिकृतपणे वापर सुरूच राहिला. त्यामुळे मनपा प्रशासनाने रेडी रेकनरच्या चालू व जुन्या दरांचा आधार घेऊन अंतिम वसुली निश्चित केली आहे. त्यानुसार मूळ भाडे मूल्य ११ कोटी ४० लाख १४ हजार २६१ रुपये आणि २ कोटी पाच लाख २२ हजार ५६७ रुपये मिळून एकूण १३ कोटी ४५ लाख ३६ हजार ८२८ रुपयांची वसुली करण्याचा निर्णय महासभेच्या ठरावानुसार प्रशासनाने घेतला आहे.
-
कडक कारवाईची तयारी
मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की ही कोट्यवधी रुपयांची रक्कम थकबाकीदार भावसार यांच्याकडून वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम विहित मुदतीत जमा केली गेली नाही, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ८१ क (३) आणि कलम ४३९ चा वापर केला जाईल. या कलमांन्वये थकीत रक्कम ही मालमत्ता कराच्या थकबाकीप्रमाणे वसूल केली जाईल. ज्यात मालमत्ता जप्ती व लिलावाचाही समावेश असू शकेल. या धडक कारवाईमुळे शहरातील अनधिकृतपणे शासकीय व पालिकेच्या जागा बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
-