वादळात नुकसानीचे आकडे कमी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : खानदेशात वादळाने मे व जून महिन्यात धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, गोठे, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली. पण २० ते २५ टक्केच नुकसान झाल्याचे आकडे अनेक शेतकऱ्यांबाबत प्रशासनाने तयार केले. कमी म्हणजेच ३० टक्क्यांखाली नुकसान झाल्याचे सांगून संबंधित शेतकरी, कृषी उद्योजकांना भरपाई मिळत नसल्याची स्थिती आहे. धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जळगाव, भुसावळ, जामनेर भागात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच रावेर, नंदुरबारमधील शहादा भागात केळीची पडझड वादळी पावसात झाली. केळीसंबंधी विमाधारक शेतकरी जाकच निकषांमुळे वादळासंबंधीच्या भरपाईसह उष्ण वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीस पात्र ठरणार नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे प्रशासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षित आहे. यात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान, टक्केवारी कशी ग्राह्य धरावी, याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या नाहीत. तसेच अनेक भागात केळीचे २० ते २५ टक्के नुकसान झाल्याने संबंधितांना भरपाई मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा सावळा गोंधळ प्रशासन गेले अनेक वर्षे घालत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेरात केळी, भाजीपाला पिकांचे सुमारे पाच हजार हेक्टरवर, चोपड्यात सुमारे दीड हजार हेक्टरमध्ये आणि धुळ्यात १२०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. पण २० ते २५ टक्के नुकसान, त्याचे आकडे भरपाईच्या अहवालात समाविष्ट केल्यास ही नुकसानीची आकडेवारी १८ ते १२ हजार हेक्टरवर केळीसंबंधी जाईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.