(लेख आहे, फोटो जाहिरातमधून घेणे)
स्वप्नील पाटील
प्रयोगशील शेतीचा ध्यास घेतलेले कै. स्वप्नीलभाई पाटील
काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि निघून जातात; पण काही माणसे आपल्या जाण्यानंतरही आपल्या विचारांत, कार्यात आणि आठवणींत सतत जिवंत राहतात. कै. स्वप्नील सुरेश पाटील हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबारचे विश्वस्त. कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी, संस्थेच्या विविध उपक्रमांचे मार्गदर्शक. नव्या तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे सहृदय सहकारी. त्यांचे ता.२२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेले निधन ही केवळ एका कुटुंबाची हानी नाही; तर संस्था, कृषी क्षेत्र, शेतकरी समाज, संघ परिवार आणि समाजजीवनाची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
स्वप्नीलभाईंच्या कुटुंबाला शेतीचा समृद्ध वारसा लाभला होता. त्यांच्या आजोबांकडून आणि कुटुंबातील ज्येष्ठांकडून मिळालेली परंपरा त्यांनी अभिमानाने जपली. आजोबा स्व. रतिलालभाई पाटील हे जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांचा वारसा स्वप्नीलभाईंनी पुढे नेला. उच्च शिक्षण घेतल्यानंतर केळी, पपई, हरभरा, गहू, बियाणे उत्पादन तसेच देशी कापूस संवर्धन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी प्रयोग केले. जैविक व नैसर्गिक शेती या विषयात प्रशिक्षण घेतले होते.
कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणे हे त्यांचे स्वप्न होते. यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध करून दिली. डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त म्हणून स्वप्नीलभाई अत्यंत तळमळीने कार्यरत होते. स्वप्नीलभाईंच्या अकाली निधनाने या अनेक स्वप्नांना अचानक विराम मिळाला.
स्वप्नीलभाईंच्या विचारांवर पुढे चालत राहणे हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल. आज स्वप्नीलभाई आपल्यात प्रत्यक्ष नाहीत; पण त्यांनी जिथे काम थांबवले, तिथून पुढे चालत राहणे, त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कै. स्वप्नीलभाई पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-संकलन : - उमेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी, डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार