ऑगस्टमध्ये सरासरी ४८ टक्के पर्जन्य
दिंडोरीवगळता इतर तालुक्यांत ९० टक्क्यांहून कमी नोंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्केच पाऊस पडला आहे. दिंडोरीवगळता जवळपास सर्वच तालुक्यांत सरासरीच्या ९० टक्क्यांहून कमी पर्जन्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनचा शेवटच्या अर्थात, सप्टेंबरमध्ये तरी पाऊस सरासरी गाठेल, अशी अपेक्षा आहे.
यंदा जिल्ह्यावर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत आहे. जूनमध्ये लहरीपणा दाखविणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा पावसाने आखडता हात घेतला. संपूर्ण ऑगस्टमध्ये २६७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात केवळ १२७ मिमी पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ४८ टक्केच आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना पावसाच्या लहरीपणाचा अनुभव येत आहे.
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये दिंडोरीत सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्यात १७८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यानंतर निफाड तालुक्यात ८५, तर बागलाणमध्ये ८४ टक्के पर्जन्याची नोंद झाली. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र ७० टक्क्यांहून कमी पाऊस झाला. दरम्यान, या वर्षी मॉन्सूनचा पहिला महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने सर्वच बॅकलॉग भरून काढला. जुलैत सरासरीच्या १३७ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाचा टेम्पो कायम राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, या महिन्यात पावसाने निम्मीही सरासरी गाठलेली नाही. परिणामी सप्टेंबरमध्ये तरी मॉन्सून उर्वरित बॅकलॉग भरून काढेल, अशी जिल्हावासीयांना अपेक्षा आहे.
वार्षिक सरासरी ६५ टक्के पाऊस
जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ९३४ मिमी आहे. यंदाच्या वर्षी मॉन्सूनचे तीन महिने संपुष्टात आले आहेत. या कालावधीत सरासरी ७५० मिमी पर्जन्य अपेक्षित असतानाच प्रत्यक्षात ६०२ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६५ टक्के आहे. दरम्यान, नाशिक विभागाचा विचार केल्यास पाचही जिल्ह्यांचे मिळून वार्षिक सरासरी ७०७ मिमी आहे. यंदा प्रत्यक्षात ४१३ मिमी पर्जन्याची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५८ टक्के आहे.