NSK26H28347
जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना पदाधिकारी व पथविक्रेते.
पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या
बहुजन मुक्ती पार्टीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३१ : पथविक्रेत्यांवरील कारवाई थांबवून त्यांना सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी द्यावी, तसेच ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना देण्यात आले.
रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळे व अन्य वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. या कारवाईत जप्त केलेला माल परत करण्यासह पथविक्रेत्यांच्या उपजीविकेच्या हक्काचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांना व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र द्यावे, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि जप्त केलेला माल परत करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहडे व जिल्हा सचिव खुशाल सोनवणे यांनी केले. यावेळी राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रा. एन. व्ही. भारंबे, डॉ. मच्छिंद्र पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. शाकीर शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, पथविक्रेते व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चौकट
स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध
ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली. स्मार्ट मीटर व जुने डिजिटल मीटर सहा महिने समांतर ठेवून वीज वापराची पडताळणी करावी, प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे वीजबिले देऊ नयेत, तसेच दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.