टूडे साठी महत्वाचे
------------
‘कन्स्ट्रक्शन टीडीआर’मधून रस्ते विकासाला चालना
चार रस्त्यांचे प्रस्ताव मनपाकडे; पहिल्या टप्प्यात गंगापूर समांतर रस्त्याचा विकास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : शहर विकास आराखड्यात नमुद असलेल्या परंतु तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी कन्स्ट्रक्शन अमेनिटी टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने महापालिकेकडे चार रस्त्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. नगरसेवकांमार्फत आलेल्या या प्रस्तावांमध्ये गंगापूर रोडला समांतर रस्त्यासह पाथर्डी, मखमलाबाद आणि सातपूर परिसरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
महापालिकेने रखडलेल्या रस्ते विकासाला चालना देण्यासाठी एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार विकासकांना कन्स्ट्रक्शन टीडीआर देण्याची योजना जाहीर केली आहे. महासभेच्या मान्यतेनंतर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी सविस्तर धोरण आणि कार्यपद्धती निश्चित केली आहे. कन्स्ट्रक्शन अमेनिटी टीडीआरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात गंगापूर रोडला समांतर रस्त्याचा विकास करण्याचे नियोजन आहे. जवळपास चार रस्त्यांचे प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. गंगापूर रोड यात महत्त्वाचा आहे. हा रस्ता जवळपास ७ ते ८ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच मखमलाबाद परिसरातील दोन रस्ते, तसेच पाथर्डी आणि सातपूर येथील प्रत्येकी एका रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त झाला आहे.
---------------चौकट
अशी आहे कार्यपद्धती
रस्ता विकासाचा प्रस्ताव सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरनियोजन विभागाकडे सादर केला जाईल. नगरनियोजन विभागाकडून प्रस्तावाची प्राथमिक तांत्रिक तपासणी केल्यानंतर तो बांधकाम सुविधा हस्तांतरणीय विकास हक्क समितीसमोर ठेवला जाईल. समितीसमोर संबंधित विकासक किंवा संस्था प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. या वेळी प्रकल्पाचे आराखडे, अंदाजपत्रक, काम पूर्ण करण्याचा कालावधी, संबंधित संस्थेचा अनुभव, उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्री, बार चार्ट तसेच गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणांचा सविस्तर विचार केला जाणार आहे. समितीच्या तत्त्वतः मान्यतेनंतर शहर अभियंत्यांकडून तांत्रिक मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या निर्देशांनुसार खुल्या निविदा प्रक्रियेतून ‘थर्ड पार्टी डेव्हलपर’ची नियुक्ती केली जाणार आहे. निवड झालेल्या विकासकाकडून अंदाजपत्रकीय रकमेच्या ५ टक्के बँक हमी घेण्यात येईल. त्यानंतर करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे.
----------
रस्त्यासोबत ड्रेनेज,
जलवाहिनीचेही काम
नवीन ले- आउट विकसित करताना त्या ले- आउटमधील रस्ता तयार करण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकाची राहणार आहे. केवळ रस्त्याचे डांबरीकरण न करता त्यासोबत मलनिस्सारण वाहिनी आणि पाणीपुरवठा वाहिनी टाकण्याचे कामही संबंधित विकासकाला करावे लागणार आहे. याशिवाय नगरसेवकांकडून विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांचा नियमानुसार विचार करून महापालिकेकडून कन्स्ट्रक्शन अमेनिटी टीडीआर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
------कोट----------
कन्स्ट्रक्शन ॲमेनिटी टीडीआरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात गंगापूर रोडला समांतर रस्त्याचा विकास केला जाणार आहे. त्यासोबतच सातपूर, पाथर्डी आणि मखमलाबाद येथील रस्त्यांचेही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
- मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका.
---------------------