विशेष पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
उपशीर्षक
जळगाव जिल्ह्यात ३० लाखांवर मतदार; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : निवडणूक आयोगाच्या १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्या सोमवारी (ता. ३१) प्रसिद्ध झाल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होत्या.
जिल्ह्यात प्रारूप मतदारयादीनुसार एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदार आहेत. प्रारूप मतदारयादी संबंधित मतदान केंद्रे, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच jalgaon.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध घाली आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ आहे. या कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल. हे अर्ज voters.eci.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
नोटीस टप्पा
सोमवार (ता. ३१) ते २९ ऑक्टोबरदरम्यान विसंगत नोंदींबाबत नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येईल, तसेच प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदारयादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
चौकट
नागरिकांसाठी ‘१९५०’ टोल फ्री क्रमांक
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ अंतर्गत अपिलाची तरतूद असून, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे अपील करता येईल. तसेच पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध विहित पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे अपील दाखल करता येईल. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या पूर्वीच्या तीन हजार ६७७ वरून प्रस्तावित तीन हजार ७०२ झाली आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन केला असून, १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित आहे. हा क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत कार्यरत राहणार आहे.