धुळे ः टुडे २ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 28370
धुळे : पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या मासिक बैठकीत बोलताना पोलिस अधीक्षक विशाल आनंद. समोर उपस्थित अधिकारी.
--
वन्यजीव संरक्षणार्थ पोलिस, वन विभागाची गस्त
-
अवैध शिकारी, तस्करीला आळा घालण्याचा निर्णय; संघर्ष रोखण्यासाठी कृती आराखडा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : बिबट्या, वाघांसह इतर वन्यजीवांचे संरक्षण, अवैध शिकारी व वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि वन विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे. मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या मासिक बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून प्रभावी कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
-
उपवनसंरक्षक एम. बी. नाईकवाडी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, निसर्गमित्र राज पाटील, तेजस पोतदार, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सौरभ शर्मा, हवालदार चेतन बोरसे, विनायक सूर्यवंशी यांच्यासह पोलिस, वन विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पौर्णिमेच्या काळात वनक्षेत्र आणि संशयास्पद मार्गांवर संयुक्त गस्त, नाकाबंदी व वाहन तपासणी करण्याचे ठरले. तसेच वन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गरजेनुसार पोलिस दलाकडून शस्त्र प्रशिक्षण दिले जाणार असून, वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवरही कठोर कारवाई केली जाईल.
-
बेकायदेशीर प्रकारांवर चाप
वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर लक्षात घेऊन संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लळींग परिसरात एअरगनच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन कडक कारवाई निश्चित करण्यात आली आहे.
-
जनजागृतीवर भर
शिरपूर परिसरातील वनक्षेत्रात होणाऱ्या गांजा लागवडीला आळा घालण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली जाणार आहे. सर्पमित्रांकडून होणारे बेकायदेशीर सर्पप्रयोग व प्रदर्शन रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कायदेशीर निर्देश देण्यात आले आहेत. अवैध शिकार आणि गांजा लागवडीची माहिती तातडीने मिळवण्यासाठी पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून माहिती संकलन व जनजागृती केली जाणार आहे. तसेच, महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्ग व सूचना फलक उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्याचे ठरले आहे.
-