वाघेरा किल्ला परिसरात दोन गिधाडांचे दर्शन
‘वल्चर वॉक’ भ्रमंतीत क्षेत्रीय सर्वेक्षणासह जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : गिधाडांच्या अधिवासाचा अभ्यास, त्यांच्या संख्येची नोंद, उपस्थितीतील बदलांचा मागोवा आणि गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित दुसरा ‘वल्चर वॉक’ नाशिक-वाघेरा किल्ला परिसरात झाला.
या वॉक दरम्यान दोन भारतीय गिधाडांची नोंद करण्यात आली. यापैकी एक गिधाड झाडावर बसलेले स्पष्टपणे आढळून आले. सकाळी सहा ते दुपारी दोन या कालावधीत नाशिक ते वाघेरा किल्ला या मार्गावर ही गिधाड निरीक्षण भ्रमंती आणि क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. यावेळी डोंगररांगा, उंच झाडे, डोंगरकडे, मोकळी मैदाने तसेच गिधाडांना विश्रांती घेण्यासाठी अनुकूल असणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली. दूरदर्शक, छायाचित्रणाची साधने आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षणाच्या माध्यमातून गिधाडांच्या उपस्थितीची नोंद घेण्यात आली.‘वल्चर वॉक’ केवळ क्षेत्रीय सर्वेक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनजागृतीची जोड देण्यात आली. या अंतर्गत वाघेरा गावातील जिल्हा परिषद शाळा, धोंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच कोणे गावातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या उपक्रमात प्रा.आनंद बोरा, भीमराव राजोळे, सागर बनकर, दर्शन घुगे, आशिष बनकर, उमेश नागरे यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते.