कुशावर्त परिसरातील गर्दीचे नियोजन गरजेचे
जिल्हाधिकारी प्रसाद : बारा हजार भाविकांकडून दर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : तिसऱ्या श्रावणी सोमवारी (ता. ३१) कुशावर्त कुंडात चार लाख ९नऊ हजार २०३ भाविकांनी स्नान केले. या वेळी कुंडावर स्नानासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरीसारखी घटना घडू शकते, अशी स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवसभरात १२ हजार ८० भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दाखल झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून प्रशासनाने शहर व परिसर तसेच प्रदक्षिणा मार्गावर सूक्ष्म नियोजन केले होते. या वेळी प्रशासनाने नियोजनातील सकारात्मक बाजू व अडचणींचा अभ्यास केला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नियोजनाची माहिती देताना रविवारी (ता. ३०) रात्री दहा ते सोमवारी (ता. ३१) दुपारी चार यावेळेत चार लाख नऊ हजार २०३ भाविकांनी कुशावर्तात स्नान केले. ‘एआय’च्या माध्यमातून ही माहिती संकलित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कुशावर्त कुंडाच्या पायऱ्यांवर होणारी गर्दी तसेच कुंडाच्या उजव्या बाजूला येणारे-जाणारे भाविक हे एकाच वेळी समोरासमोर येतात. त्यामुळे गर्दी होत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या मुद्यावर काम केले जाईल, असे प्रसाद यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की कुशावर्त व मंदिर परिसरात एकाचवेळी गर्दी टाळण्यासाठी शहरात सहा ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले. भाविकांना या ठिकाणावरून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होते. मात्र, हे बॅरिकेटिंग तोडून काही भाविकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत अशा भाविकांना अटकाव केला असला तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने या मुद्यावर आम्ही अधिक भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शौचालयांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यापेक्षा विविध ठिकाणी ते ठेवल्यास भाविकांची गैरसोय टळण्यास मदत होईल, असाही निष्कर्ष आजच्या अनुभवातून पुढे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदक्षिणा मार्ग व कुशावर्त भागात भाविकांकडून होणाऱ्या रेटारेटीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘त्या’ भाविकांवर कारवाई
भाविकांसाठी जादाच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पण, तरीही भाविक बसगाड्यांच्या खिडकीतून आत घुसत होते. काही जणांनी टपावर बसून प्रवास केल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रवाशांचे छायाचित्र उपलब्ध असून, परिवहन महामंडळामार्फत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा आयुष प्रसाद यांनी दिला. या वेळी एसटीचे नियोजन चुकल्याचे सांगताना ‘एसटी’ प्रशासनाला योग्य ती समज दिली जाईल, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
--
…बुलेटस
या उपाययोजनांची नितांत गरज
* कुशावर्त तीर्थाशेजारील प्राचीन कुंडावर जाळी बसविणे
* वाळलेल्या वडाच्या झाडाभोवती तयार केलेला चौथरा कमी करणे
* भगवान शंकराच्या मंदिराकडून येणारे भाविक आणि कुशावर्त तीर्थातून बाहेर पडणारे भाविक यांच्यासाठी वेगवेगळे मार्ग
* महिला व पुरुषांसाठी वस्त्रांतरगृह वाढविणे
* कुशावर्त तीर्थाशेजारील अतिक्रमण काढणे