उपेक्षित अन् मौखिक आदिवासी साहित्यिकांना मिळणार व्यासपीठ

उपेक्षित अन् मौखिक आदिवासी साहित्यिकांना मिळणार व्यासपीठ
Published on
पान एक मेन ---------------------- 28403 नंदूरबार : व्यारा येथील बैठकीस उपस्थित साहित्यिक वाहरूभाऊ सोनवणे, डॉ.जितेंद्र वसावा, सुनील गायकवाड, भीमसिंग वळवी, जेलसिंग पावरा, संतोष पावरा, सुमित्रा वसावे, ठोकोर चौधरी, डॉ.विमुखभाई पटेल आदी. -------------------------- उपेक्षित अन् मौखिक आदिवासी साहित्यिकांना मिळणार व्यासपीठ व्यारामध्ये रंगणार अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३१ : आदिवासींचा संघर्ष केवळ उपजीविकेच्या साधनांसाठीच नव्हे, तर प्रस्थापित व्यवस्थेकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्धही राहिला आहे. या संघर्षातील आदिवासींचा अनुभव व वेदनांसह संस्कृती, परंपरेतूनही मानवी मूल्यांना अभिव्यक्त करणारे समृद्ध साहित्य निर्माण झाले. मात्र, त्यातील काही साहित्य कागदावर उतरले तर बहुतांश साहित्य आजही मौखिक परंपरेतच राहिले. या साहित्याचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासह उपेक्षित व मौखिक आदिवासी साहित्यिकांना व्यापक विचारमंच उपलब्ध करून देण्याचा निर्णय नंदुरबारात झालेल्या आदिवासी साहित्यिकांच्या बैठकीत घेण्यात आला. अखिल भारतीय आदिवासी साहित्य मंचमार्फत २४ व २५ सप्टेंबरला व्यारा (गुजरात) येथे आयोजित अखिल भारतीय आदिवासी संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील कवी, लेखक व साहित्यिकांची नंदुरबारात नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, डॉ.जितेंद्र वसावा, सुनील गायकवाड, भीमसिंग वळवी, जेलसिंग पावरा, संतोष पावरा, सुमित्रा वसावे, ठोकोर चौधरी, डॉ.विमुख पटेल, अरविंदभाई पटेल, ईश्वर पटेल, शैलेश चौधरी, बिपिन चौधरी, प्रा.सुलतान पवार, प्रा.महेंद्र गावित, योगेश पावरा यांच्यासह आदिवासी कवी, साहित्यिक उपस्थित होते. बैठकीत मौखिक साहित्यावर चर्चा झाली. आदिवासींच्या मौखिक परंपरेत लोककथा, लोकगीते, पारंपरिक ज्ञान, निसर्गविषयक जाणिवा, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे पैलू जतन झाले. मात्र, या साहित्याचे पुरेसे दस्तऐवजीकरण झाले नसल्याने ते समाजासमोर येऊ शकले नाही. अशा या साहित्याचे संकलन, लेखन, दस्तऐवजीकरण आणि प्रकाशनावरही संमेलनाच्या माध्यमातून भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासींच्या साहित्यात निसर्गाशी असलेले नाते, समूह जीवन, समता, बंधुभाव, श्रमप्रतिष्ठा व मानवी मूल्ये आढळतात. या साहित्याची ओळख निर्माण करत नव्या आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, व्यासपीठ उपलब्ध करून देणे व देशभरातील आदिवासी साहित्यिकांना एका व्यासपीठावर आणणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे डॉ.वसावा व सुनील गायकवाड यांनी सांगितले. या संमेलनातून आदिवासी साहित्याच्या विविध प्रवाहांवर चर्चा, साहित्यिकांचे विचारमंथन, काव्यवाचन, मौखिक साहित्य सादरीकरण शिवाय संस्कृती व परंपरांचे दर्शन घडविणारे उपक्रम घेण्यात येणार असल्याचे या‌ बैठकीत सांगण्यात आले. --------------------- निरक्षरांचे साहित्यही प्रभावी आदिवासी साहित्य केवळ प्रकाशित पुस्तके किंवा लिखित साहित्यांपुरते मर्यादित नाही. ज्येष्ठांच्या स्मृतीत, गावपाड्यांच्या बोलीत, लोकगीतांच्या सुरांत आणि पारंपरिक कथनातून जिवंत असलेले साहित्यही प्रभावी असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यामुळे शब्दबद्ध न झालेले अनुभव, लोकपरंपरा अन् सांस्कृतिक ठेवा या माध्यमातून जपला जाणार आहे. संमेलनात ज्यांचे साहित्य दमन, वर्चस्व व विषमतावादी असेल त्यांना सहभागी करू नये. संविधानिक मूल्ये जपणारे व निसर्ग नियमांचे पालन करणारे साहित्यच येथे मांडले गेले पाहिजे. - वाहरू सोनवणे
Marathi News Esakal
www.esakal.com