जिल्ह्यात ४० लाख ७६ हजार मतदार
---
‘एसआयआर’ : प्रारूप याद्यांवर दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरची मुदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत (एसआयआर) दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील ४० लाख ७६ हजार ६६८ मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत या प्रारूप याद्यांवर दावे-हरकती नोंदविता येणार आहेत.
‘एसआयआर’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्याला सोमवार (ता. ३१)पासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, की मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मतदार यादीतील नोंदींच्या तपासणीत आढळणाऱ्या त्रुटी, विसंगती अथवा हरकतींबाबत संबंधितांना योग्य संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळासह संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी, तहसील कार्यालय व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, अशा सूचनाही प्रसाद यांनी केल्या. या वेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.
नवमतदारांनी नोंदणी करावी
ता. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता तारखेस किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ अर्ज भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. तसेच, लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदार यादीतील नोंदीत दुरुस्तीसाठी नमुना ८, तर नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत दाखल करता येईल. हे अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
---
हेही महत्त्वाचे
- https://nashik.gov.in/ संकेतस्थळावर यादी प्रसिद्धी
- ‘एसआयआर’वेळी नव्याने ३९ मतदान केंद्रांची भर
- तीनशेहून कमी मतदार असलेले दहा केंद्रांचे समावेशन
- दावे-हरकतींवरील सुनावणीसाठी ४३५ अधिकारी नियुक्त
---
सव्वादहा लाख मतदार वगळले
‘एसआयआर’च्या पहिल्या टप्प्यात १० लाख २७ हजार ८९४ मतदारांशी संपर्क न झाल्याने त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्यात चार हजार ९१ हजार २७३ मतदारांचा ठावठिकाणा आढळून आला नाही; तर एक लाख ६७ हजार ५०५ मृत, दोन लाख ६१ हजार ६५३ कायमस्वरूपी स्थलांतरित, एक लाख तीन हजार ७०९ दुबार, तसेच नोंदणीसाठी सहकार्य न करणाऱ्या तीन हजार ७५४ मतदारांचा समावेश आहे.