फोटो : H28412/H28413
नाशिक : अटक करण्यात आलेली घरफोड्या करणारी आंतरराज्य टाेळी. शेजारी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह अंबड युनिट व गंगापूर पोलिसांचे पथक. दुसऱ्या छायाचित्रात बनावट नंबरप्लेट.
---
भरदिवसा घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
अंबड गुन्हे शाखेची कामगिरी : ३२ गुन्ह्यांची उकल; टोळीवर राज्यभर गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : टोल नाका चुकवून सुरत ते नाशिक प्रवास करून भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीला अखेर शहर गुन्हे शाखेच्या अंबड युनिट तीनच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चौघांना अटक केल्याने शहरातील ३२ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. विशेषतः यात २० घरफोड्या या गंगापूर रोड परिसरातील आहेत. टोळीकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित टोळीविरोधात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, रत्नागिरी, पुणे, अकोला, जळगाव यांसह भावनगर (गुजरात) मध्ये घरफोडीचे ७२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांचे दोन साथीदार फरारी आहेत. मिलिंद खैरनारविरोधात अमरावतीत सहा गुन्हे दाखल आहेत.
चंद्रकांत उर्फ बाबा राजेंद्र पाटील (२२, रा. रुद्राक्ष रेसिडेन्सी, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात), मिलिंद संजय खैरनार (३२, रा. आराधना पॅलेस, झोलवा गाव, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात), बाळकृष्ण गोपी उर्फ जितू गोकूळ जाधव (३१, रा. झोलवा गाव, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात), सौरभ प्रकाश महाजन (२८, रा. लिहा बु., ता. मौताडा, जि. बुलढाणा), अशी संशयितांची नावे आहेत. सौरभ गोपाल वर्मा, विनोद राबिया (दोघे रा. स्वप्नील अपार्टमेंट, महात्मानगर) यांच्या फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफोडी झाली होती.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संदीप मिटके, सहायक आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर शेख, सहायक निरीक्षक तुषार देवरे, अंबड युनिटचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, कुणाला पचलोरे, गौरव धात्रक, महेंद्र दोंदे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, राजेश महाले, भगवान जाधव, चारुदत्त निकम, संजय बेनके, हर्षल जाधव, अरुण चव्हाण, रवींद्र मोहिते, गिरीश महाले आदींनी सदरची कामगिरी बजावली आहे.
---
अशी होती कार्यपद्धती
संशयित पाटील, खैरनार व जाधव हे तिघे सुरतवरून कारने नाशिकच्या दिशेने जळगाव, धुळेमार्गे येताना टोल नाका चुकवून पर्यायी मार्गाने येत. नाशिकपासून १०० कि.मी.अंतरावर असतानाच ते स्मार्ट फोन स्वीच ऑफ करायचे. गंगापूर रोड परिसरातील ज्या अपार्टमेंटमध्ये वॉचमन वा सीसीटीव्ही नाही, असे हेरायचे. सीसीटीव्ही असल्यास तोंडाला रुमाल बांधायचे. फ्लॅटचा कडीकोयंडा काही क्षणात तोडायचे आणि किंमती ऐवज चोरायचे. एका दिवसाला किमान चार ते पाच घरफोड्या करून ते बुलडाणा गाठत. येताना आणि जाताना ते त्यांच्या कारचे नंबर सतत बदलत राहायचे.
--
कारागिराकडून सोने वितळावयाचे
संशयित सौरभ महाजन हा संशयित जाधव याचा भाचा असून, तो काही काळ जळगावमध्ये सराफाकडे कारागीर होता. सध्या बुलडाण्यात राहत असलेल्या महाजन या संशयितांकडील चोरीचे सोने वितळून देत असत. त्यानंतर चौघे त्यात हिस्सा करून पसार व्हायचे. संशयितांकडे दोन कार आहेत. या कारला ते सतत बनावट नंबरप्लेट वापराचे. त्यांच्याकडून २६ बनावट नंबरप्लेट सापडल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन छोटे मोबाईल व सीम कार्ड वापरायचे. सीमकार्डसाठी त्यांनी सुरतमधील एकाला हाताशी धरले होते. त्याच्याकडून ते सीम घ्यायचे. गुन्ह्यांनंतर लगेचच मोबाईल आणि सीम नष्ट करून फेकून द्यायचे. त्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना कठीण जात होते.
--
अखेर सापडले
सहायक निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील बारकाईने विश्लेषण करीत असताना नष्ट केलेल्या सीमच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ते सुरतपर्यंत पोचले. सीम पुरवणाऱ्याने माहिती दिली. परंतु संशयित चंद्रकांत पाटील हाती लागला नाही. दरम्यान, तो जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे आल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी धरणगावमधून चंद्रकांत पाटील, तर उर्वरित दोघे खैरनार व जाधवला सुरतमधून आणि महाजन याला बुलडाण्यातून अटक केली.
---
या गुन्ह्यांची उकल
गंगापूर हद्दीतील : २०
इंदिरानगर हद्दीतील : ९
मुंबई नाका हद्दीतील : ३
एकूण ३२ गुन्हे
यात १३० ग्रॅम सोने, ३ किलो २३२ ग्रॅम चांदी, २४ नंबरप्लेट, घरफोडीचे साहित्य.
एकूण मुद्देमाल : १७ लाख १५ हजार ३६७ रुपये