''मुक्त''च्या प्रवेशास १५ पर्यंत मुदतवाढ
विद्यापीठातील १३० शिक्षणक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १३ विविध विद्याशाखांच्या १३० वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणक्रमांसाठी विनाविलंब शुल्क १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची पदवी मिळवता येईल किंवा मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकावेळी प्रवेश घेता येईल. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार यावर्षी पारंपारिक शिक्षणक्रमांसह नवीन आणि व्यावसायिक शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देत प्रवेश अर्ज दाखल करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे. विद्यापीठामध्ये निरंतर शिक्षण, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषिविज्ञान, शिक्षणशास्त्र, आरोग्य विज्ञान, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशन, संगणकशास्त्र, महाज्ञानदीप, ग्रामीण विकास व उद्योजकता, ललित कला केंद्र तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास या शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश संधी उपलब्ध असेल.