बहिणाबाई विद्यालयात
क्रीडादिनाचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयाच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, फुटबॉल आदी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सुरवातीला मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे यांच्या हस्ते खो-खो मैदानाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. मैदानावरील विद्यार्थ्यांचा उत्साह, विजयासाठीची जिद्द व संघभावनेमुळे विद्यालयाचे क्रीडांगण गजबजून गेले. क्रीडा शिक्षक संतोष पाटील यांनी स्पर्धांचे नियोजन केले. पंच म्हणून राजेश वाणी व संतोष पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग काळे व समन्वयक प्रतिभा खडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी विशाल पाटील, दिनेश चौधरी, सीमा चौधरी, स्वाती कोल्हे, डॉ. प्रतिभा राणे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू भावना जाधव, खुशी सोनवणे, मीनल महाले, रवींद्र बारी, रुद्र कोळी, रोशनी राठोड, नेहा बडगुजर, हर्षल पाथरवट, तेजश्री जगताप, रागिनी तडवी, नंदिनी पावरा, शुभम सपकाळे, योगेश सूर्यवंशी व प्रथमेश भोई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. नारखेडे म्हणाले की, खेळात यश मिळविण्यासाठी कौशल्यासोबत कठोर मेहनत, सातत्य, शिस्त व जिद्द आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेऊन शाळेचे, आईवडिलांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे.