वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शुक्रवारपासून परीक्षा
---
चौथ्या टप्प्यातील उन्हाळी परीक्षेत ४० हजार विद्यार्थी प्रविष्ट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांना शुक्रवार (ता. ४)पासून राज्यभरात सुरुवात होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उन्हाळी २०२६ च्या टप्पा-४ मधील पदवी व पदव्युत्तर परीक्षांचा यात समावेश असून, राज्यस्तरावर ३९ हजार ८९७ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. विद्यापीठात प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार यंदाही परीक्षेच्या दिवशी ऑनलाइन प्रश्नपत्रिका उपलब्ध केली जाईल.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे टप्प्याटप्प्याने आयोजन केले जाते. उन्हाळी २०२६ टप्पा-४ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सुरू होणारी ही परीक्षा २६ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. राज्यातील एकूण १७० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. या परीक्षेत राज्यभरातून एकूण ३९ हजार ८९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या टप्प्यात एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस आदी पदवी, तसेच वैद्यकीय, आयुर्वेद आदी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश असेल.
पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने यापूर्वीच्या परीक्षांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हिवाळी २०२४ ते हिवाळी २०२५ व उन्हाळी २०२६ मधील पहिल्या तीन टप्प्यांतील परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांच्या प्रश्नप्रत्रिका ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याआधी पाठविण्यात आल्या होत्या. तसेच, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केले आहे. याच प्रणालीचा यंदाही अवलंब केला जाईल. प्रश्नप्रत्रिका परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास आगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी नऊला व दुपार सत्रासाठी दुपारी एकला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.