‘शालार्थ’मधील संशयितांना हायकोर्टाकडून दिलासा नाही
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण : येत्या १६ तारखेला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या १४ संशयितांच्या अर्जावरील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाने या संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळू न शकल्याने त्यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.
गेल्या महिन्यात या प्रकरणाशी संबंधित संशयितांनी नाशिक रोड अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. संशयित भाऊसाहेब चव्हाण, मीनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनीष कदम, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देवीदास महाजन, अनिवाश पाटील, मनोज पाटील, शरद शिंदे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे अटकेपासून बचावासाठी या संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी (ता. ३१) सुनावणी होती. परंतु त्यावर कामकाज होऊन सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे संशयितांचा हिरमोड झाला असून, दिलासा न मिळाल्याने त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
नाशिक रोड पोलिस ठाण्यात गेल्या मार्च महिन्यात शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा विशेष तपास दिला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने धुळ्यातून प्रशांत वाडिले, शशिकांत हिंगोणीकर, तर शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड यांना अटक केली. संजय गरुड वैद्यकीय कारणास्तव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरित तिघे नाशिक रोड मध्यवर्ती कारगृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच, माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणीही याचप्रकरणी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
पाच पथके परजिल्ह्यात
शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग निष्पन्न झालेले शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी शहर गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. यासाठी शहर गुन्हे शाखेची पाचपेक्षा अधिक पथके संशयितांचा मागावर परजिल्ह्यात शोध घेत आहेत. तर, गुन्हे शाखेत धुळे व जळगाव जिल्ह्यातील बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणी सुरू आहे. त्यासाठी या संस्थेतील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांची चौकशी केली जात आहे. या चौकशीला सामोरे जाणारे घामाघूम होत आहेत.