पान तीन मेन
-------------------
द्वारका-नाशिक रोड मार्ग विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा
दहा दिवसानंतर कामास सुरुवात शासकीय जमीन हस्तांतरणाची अडचण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : कुंभमेळ्याच्या निमित्ताने द्वारका ते नाशिक रोड या ६.४ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महापालिकेमार्फत हे काम केले जाणार असून एकूण सोळा निविदाधारक यासाठी पात्र झाले आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर साधारण दहा दिवसानंतर कामाला सुरुवात होणार आहे. परंतु, या मार्गावर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या आस्थापनांची मालमत्ता असल्याने आणि अद्याप जागांचे हस्तांतरण न झाल्याने मार्ग विस्तारीकरणात अडचण निर्माण होणार आहे.
द्वारका ते नाशिक रोड या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याने काही वर्षांपुर्वी या रस्त्यावर दत्त मंदिर ते द्वारका या दरम्यान उड्डाणपूल निश्चित करण्यात आला होता. मात्र, या मार्गावर मेट्रो निओचे नियोजन करण्यात आल्याने डबलडेकर उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, आर्टिलरी सेंटर, गांधीनगर प्रेस यामुळे परवानगी मिळण्यास अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर प्रकल्प रेंगाळला. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सुरुवातीला महापालिकेमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. भुसंपादनासह सर्व प्रक्रिया महापालिकेमार्फत पार पाडली जाणार होती. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २२१ कोटींचा निधी मंजूर कला. परंतु, महापालिकेने तीनदा निविदा प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळाला नाही. या दरम्यान निविदा प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने घेतली. नुकत्याच निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यात १६ निविदाधारक पात्र झाले आहेत. पुढील दहा दिवसात कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
---------------
असा असेल रस्ता
सध्या अस्तित्वात असलेला २२ मीटरचा रस्ता असून त्यात आणखी २३ मीटरची भर टाकून हा रस्ता दहापदरी केला जाणार आहे. एकूण ४५ मीटर रस्ता रुंद केला जाणार आहे. एकूण दहा पदरी रस्ता असून त्यात दोन सेवा (सर्व्हिस रोड) रस्त्यांचा समावेश आहे. यात नंदिनी नदीवरील पुलांचे रुंदीकरण केले जाणार आहे.
-------------------
भूसंपादनात अडचणी
या मार्गाचे रुंदीकरण करताना केंद्र सरकारी आस्थापनांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या निवासी भागाचा समावेश आहे. रुंदीकरणासाठी जागा देण्यासाठी केंद्रीय स्तरावर बोलणी चालू असल्याचे सांगितले जात असले तरी जागा ताब्यात मिळाली तरी त्यापूर्वी संरक्षक भिंत बांधून द्यावी लागणार आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.
--------------------
वाहतूक वळविणार
६.४ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर द्वारका ते नाशिक रोड या दरम्यान एकेरी वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे अवजड वाहने जेल रोड तसेच जय भवानी रोड मार्गे वळविण्याचे नियोजन आहे. एकेरी मार्गावरून सिटीलिंक बसेस, चारचाकी, दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान रस्ता रुंदीकरण पूर्ण होईपर्यंत वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडणार आहे. वाहतुकीतून मार्ग काढताना कॉलनी रस्त्यांवरील ताण या निमित्ताने वाढणार आहे.