एआय चित्र वापरता येईल
---
थोडीशी जागरूकता, एखाद्याचा जीव वाचवू शकते
(उपशीर्षक)
आरोग्यविषयक ‘कोड लाइफ’ कार्यक्रमात तज्ज्ञाकडून जनजागृती संदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : कोणता आजार कधी येईल, सांगणे कठीण आहे. आपल्या समोर कोणाला काही त्रास होऊ लागल्यास त्याला कशा पद्धतीने हाताळावे. यानंतर रुग्णालयात दाखल करावे. अर्थात आपल्यातील थोडीशी जागरूकता एखाद्याचा जीव वाचवू शकते, असा संदेश कोड लाइफ या कार्यक्रमातून देण्यात आला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि आयएससीसीएम जळगाव शाखेच्या संयुक्त विद्यामाने ‘कोड लाइफ’ या आरोग्य विषयक सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. तेजेंद्र चौधरी यांनी अचानकपणे तोल जाणे, धुसर किंवा डबल दिसणे, तोंड किंवा चेहरा वाकडा होणे, बोबडी वळणे ही पक्षघाताची (पॅरालिसिस) लक्षणे असतात. रक्तदाब आणि मधुमेह याचे मुख्य कारण बैठेकाम, व्यायामाचा अभाव, व्यसने, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या जीवनशैलीमुळे हा त्रास होतो. अशी लक्षणे दिसताच रुग्णाला धीर द्यावा. लक्षणे दिसताच त्याची वेळ नोंद करावी आणि त्वरित हॉस्पिटलला घेऊन जाणे असा सल्ला दिला.
अँटिबायोटिक्सचा चुकीचा वापर धोकादायक का ठरू शकतो? याविषयी डॉ. स्वप्निल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र पाटील यांनी बेसिक लाइफ सपोर्ट याविषयी माहिती देऊन सीपीआरचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
रोटरी वेस्टचे उपाध्यक्ष संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आयएससीसीएम जळगाव शाखेच्या प्रभारी अध्यक्ष डॉ. लीना पाटील, रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपिन काबरा, सुनील सुखवानी, योगेश भोळे, ॲड. सुरज जहांगीर, सुदाम वाणी, विवेक काबरा आदी उपस्थित होते.
चौकट
अवयवदानातून नवजीवन
अवयवदानातून अनेकांना नवजीवन कसे देता येते; याविषयी डॉ. अमित भंगाळे यांनी माहिती दिली. डॉ. कल्पेश गांधी यांनी प्रौढांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे, असे सांगून कोणत्या वयोगटासाठी कोणत्या व किती वेळा लसीकरण महत्त्वाचे आहे ते सांगितले.