धुळे टुडे ३ साठी मेन...
---
फोटो- NSK26H28457
धुळे : महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या बैठकीप्रसंगी उपस्थित समितीचे पदाधिकारी, सदस्य.
---
नागरी समस्या, कामांच्या दर्जाबाबत पाठपुरावा करणार
---
महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचा बैठकीत निर्धार; ध्वनीप्रदुषणाबाबत जनजागृती
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : शहरातील विविध नागरी प्रश्नांसह प्रामुख्याने रस्ता कामांचा दर्जा, तांत्रिक बाबी तसेच ध्वनीप्रदुषणाच्या समस्येवर संबंधित यंत्रणांना निवेदन देणे तसेच जनजागृती करण्याचा निर्णय महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने बैठकीत घेतला.
धुळे शहरातील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची बैठक तब्बल आठ महिन्यांनंतर झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. समितीचे निमंत्रित सदस्य कैलास हजारे अध्यक्षस्थानी होते. या वेळी शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाला निवेदने सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील आग्रा रोड कामाच्या दर्जाबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. सध्या शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते बांधकामाचा दर्जा, कामाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची मागणी करण्यात आली. आग्रा रोडवर सध्या सुरू असलेल्या गटारींच्या बांधकामाबाबतही बैठकीत चर्चा झाली. गटारींचा उतार, पाण्याचा योग्य निचरा, बांधकामाचा दर्जा आणि संपूर्ण काम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले.
ध्वनीप्रदुषणावर जनजागृती
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. गणेशोत्सवात डीजेच्या आवाजावर नियंत्रण राहावे किंवा शक्य असल्यास ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी जनजागृती करावी यासाठी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले. गणेशोत्सव, वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक लावले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ‘जाहिरात फलकमुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
पाठपुराव्याचा निर्धार
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही बैठक होत असल्याने यापुढे समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याची गरज सदस्यांनी व्यक्त केली. किमान महिन्यातून एकदा महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची बैठक घेण्यात यावी, यावर सदस्यांनी एकमत व्यक्त केले. शहरातील रस्ते, गटारी, वाहतूक, ध्वनिप्रदूषण, अनधिकृत जाहिरात फलक तसेच, शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यासंबंधी पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. बैठकीस ॲड. चंद्रकांत येशीराव, संजय बगदे, संजय लक्ष्मण पाटील, सुधीर बडगुजर, दिलीप उपाध्ये, अशोक तोटे, सचिन सोनवणे, मिलिंद सोनवणे, पप्पू सहानी, डी. के. शिरोळे, धनंजय गाळणकर, संदीप शेवतकर, श्रीकृष्ण बेडसे, ईश्वर बारी आदी उपस्थित होते.
---