प्रारुप याद्यांवर दावे-हरकती नोंदविता येणार

प्रारुप याद्यांवर दावे-हरकती नोंदविता येणार
Published on
एसआयआरच्या प्रारूप मतदार याद्यांवर ३० पर्यंत दावे-हरकती जिल्ह्यात ४० लाख ७६ हजार ६६८ मतदार; नाव तपासणीसाठी ऑनलाइन सुविधा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील ४० लाख ७६ हजार ६६८ मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांवर दावे, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दाखल दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४३५ मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज केलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे-हरकतींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाला २९ ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. गाव, प्रभाग आणि मतदान केंद्र स्तरावर ही प्रक्रिया राबविण्यात येत असून नागरिकांनी प्रारूप यादी तपासून नाव आणि अन्य तपशील अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. नवमतदारांनाही संधी प्रारूप यादीत नाव नसलेल्या तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नाव नोंदणीसाठी नमुना ६ भरता येईल. मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर एखाद्या नोंदीवर हरकत घेऊन ती वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल. हे अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत. असे तपासा मतदार यादीतील नाव प्रारूप मतदार यादीत नाव तपासण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरील ‘Search Your Name in Draft Electoral Roll of SIR 2026’ या सुविधेचा वापर करता येईल. यामध्ये तीन प्रकारे नाव शोधता येते. १. Search by EPIC : मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) टाकून नाव शोधता येईल. २. Search by Details : राज्य, नाव, नातेवाइकाचे नाव, वय किंवा जन्मतारखेसह लिंग, जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती भरून शोध घेता येईल. ३. Search by Mobile : राज्य व नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या आधारे नाव शोधता येईल. प्रारूप याद्या नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर, संबंधित मतदान केंद्रांवर तसेच तहसीलदार व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या Voter Service Portal वरही त्या पाहता येतील. संपर्क क्षेत्राबाहेर १० लाखांहून अधिक मतदार जिल्ह्यातील १० लाख २७ हजार ९८४ मतदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. यामध्ये १ लाख ६७ हजार ५०५ मयत, ४ लाख ९१ हजार २७३ गैरहजर, २ लाख ६१ हजार ६५३ स्थलांतरित आणि १ लाख ३ हजार ७०९ दुबार मतदारांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ७५४ मतदारांनी नाव नोंदणीस असमर्थता दर्शविली आहे. या मतदारांची नावे संभाव्य कारणांसह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १९५० वरूनही मिळणार माहिती प्रारूप मतदार यादीतील नावाची माहिती मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकाचाही वापर करता येईल. यासाठी एसएमएसमध्ये ECI टाइप करून स्पेस द्यावी आणि त्यानंतर मतदार ओळखपत्र क्रमांक टाइप करून १९५० वर पाठवावा. त्यानंतर मतदार यादीतील नोंदीची माहिती एसएमएसद्वारे मिळेल. सुनावणीसाठी १२ प्रकारचे पुरावे प्रारूप यादीत नाव असले तरी नोंदींबाबत संदिग्धता आढळलेल्या मतदारांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटिशीत सुनावणीची तारीख, वेळ आणि ठिकाण नमूद केले जाईल. सुनावणीस उपस्थित राहताना खालीलपैकी ग्राह्य पुरावे सादर करता येतील : केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र. - १ जुलै १९८७ पूर्वी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, टपाल विभाग, एलपीजी वितरक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी जारी केलेले ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज. - सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेला जन्मदाखला. - पारपत्र (पासपोर्ट). - मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाचे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र. - सक्षम राज्य प्राधिकाऱ्याने जारी केलेले कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र. - वनहक्क प्रमाणपत्र. - सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओबीसी, एससी किंवा एसटी जात प्रमाणपत्र. - राष्ट्रीय नागरिक नोंदणीतील नोंद. - राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली कुटुंब नोंदवही. - शासनाने जारी केलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र. - आधार कार्ड (केवळ ओळख सिद्ध करण्यासाठी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com