धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
महिला बचत गटांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करा
-
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते : जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीची बैठक
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेत पार पडली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक शाखास्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांचा तातडीने निपटारा करून महिला स्वयं-सहाय्यता गटांना आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
-
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती व प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्र कर्ज प्रस्तावांना विनाकारण विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना बँकांना करण्यात आली. प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित यंत्रणा व अर्जदारांना त्याची स्पष्ट व तातडीने माहिती द्यावी, जेणेकरून प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होईल. बँकांच्या मुख्य व क्षेत्रीय कार्यालयांनी शाखांना आवश्यक मार्गदर्शन करून रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीच्या प्रस्तावांना गती द्यावी, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
-
विविध योजनांचा आढावा
बैठकीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच विविध मागासवर्गीय विकास महामंडळांच्या कर्ज योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध महामंडळांकडून बँकांकडे पाठविण्यात आलेल्या पात्र प्रस्तावांचा प्राधान्याने निपटारा करून लाभार्थ्यांना वेळेत अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. समाजातील विविध घटकांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी बँकांनी अधिक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
-
कर्जवाटप प्रमाण वाढवा
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे आणि प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन उर्वरित पात्र प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या. तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश बैठकीत दिले गेले. शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजक, स्वयं-सहाय्यता गट आणि समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँका व प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधील अर्थसहाय्याचा लाभ अधिकाधिक पात्र घटकांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात कर्जवाटपाचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीच्या समारोपात दिले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
कर्जपुरवठ्यात वाढ करण्याचे निर्देश
मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन विभागांच्या योजनांतील पात्र लाभार्थ्यांसाठी कर्जपुरवठा वाढवण्यावर भर देण्यात आला. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन करावे. बँक आणि संबंधित शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे तयार करणे, त्यांचा नियमित पाठपुरावा करणे आणि कर्ज मंजुरीची प्रक्रिया गतिमान करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.