आजच आवश्यक
-----------------
तीन प्रभागांत रस्ते दुरुस्तीला अद्याप मुहूर्तच नाही
----
महापौरांनी घेतली आढावा बैठक; तातडीने काम सुरू करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : शहरातील खड्डे बुजविण्यासाठी विविध भागांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असताना प्रभाग क्रमांक १३, १४ व १५मध्ये मात्र, अद्याप कामाला सुरुवातच झालेली नसल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता.१) घेतलेल्या आढाव्यात समोर आले.
नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी होत असतानाही तीन प्रभागांतील कामे रखडल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी व मक्तेदारांना तातडीने काम सुरू करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना कानळदा रोड, काळेनगर, घाणेकर चौक ते भिलपुरा, रथ चौक, दंगलग्रस्त कॉलनी ते सेवा मंडळ, रिंगरोड पुल, बजरंग बोगदा, एसएमआयटी रोड, खंडेरावनगर रेल्वे पूल परिसर, हरिविठ्ठलनगर ते वाघनगर स्टॉप, मेहरुण, अयोध्यानगर, सुप्रिम कॉलनी आदी ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे कामे झाले असल्याची माहिती दिली. काही मार्गांवर रात्रीच्या वेळेतही काम सुरू ठेवण्यात येत आहे.
तीन प्रभागांत सुरवात नाही
प्रत्येक प्रभागाला महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे १० लाखांचे कामे आयुक्तांनी मंजूर केले आहे. त्यानुसार १ कोटी ९० लाखांच्या या कामांमध्ये प्रभाग क्रमांक १३, १४ व १५मध्ये काम सुरू झाले नसल्याची माहिती बैठकीतून समोर आली. यावर महापौर काळे यांनी नाराजी व्यक्त करीत शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ही नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडीत बाब आहे. कोणत्याही प्रभागात काम थांबवले जाणार नाही, अशा सूचना दिल्या.
गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्त करा
गणेशोत्सव १३ दिवसांवर असून, सर्व प्रभागांतील रस्ते दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी, अभियंते व मक्तेदारांना आवश्यक त्या सूचना यावेळी महापौरांनी दिल्या. पुढील काही दिवसांत प्रलंबित कामांना सुरुवात करून ती पूर्ण करण्याचे सांगितले.