फार्मसीचे प्रवेश रेंगाळल्‍याचे विद्यार्थी हतबल

फार्मसीचे प्रवेश रेंगाळल्‍याचे विद्यार्थी हतबल
Published on
फार्मसीचे प्रवेश रेंगाळल्‍याचे विद्यार्थी हतबल बी. फार्मसीची प्रारूप यादी जारी, डी.फार्म नोंदणीची ११ पर्यंत मुदत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१ : इतर विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या तीन फेऱ्यांपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली असतांना, अद्यापपर्यंत औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांची प्रक्रिया रेंगाळलेली आहे. यामुळे विद्यार्थी हतबल स्‍थितीत असून, प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याच्‍या प्रतीक्षेत आहेत. सद्यःस्‍थितीत बी. फार्मसीची प्रारूप यादी जारी झाली असून, डी. फार्मसी नोंदणीला ११ सप्‍टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. प्रवेश निश्‍चितीला दसरा-दिवाळी उजाडण्याची शक्‍यता आहे. गेल्‍या काही वर्षांपासून औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांचे प्रवेश विलंबाने होत आहेत. विविध तांत्रिक अडचणी उद्‌भवल्‍याने थेट डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया यापूर्वी राबविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून, महाविद्यालयीन प्राध्यापकांना वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करताना तारेवारची कसरत करावी लागली होती. गेल्‍या काही वर्षांमध्ये निर्माण झालेल्‍या गोंधळातून यंत्रणेने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्‍यात जाहीर झाला होता. असे असतांना, पदवी (बी.फार्मसी)ची नोंदणी प्रक्रिया ३१ जुलैपासून, तर पदविका (डी.फार्मसी) ची नोंदणी प्रक्रिया ३० जूनपासून सुरु केली होती. यादरम्‍यान फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाशी संलग्‍न प्रकरण न्यायप्रविष्ट असल्‍याने संपूर्ण देशभरातील प्रवेश प्रक्रिया यंदाही रेंगाळली आहे. सध्या बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्‍या प्रक्रियेत २७ ऑगस्‍टला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून, हरकती नोंदविण्यासाठी सोमवार (ता.३१) पर्यंत मुदत दिली होती. आता गुरुवारी (ता.३) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. त्‍यानंतर प्रत्‍यक्ष प्रवेश फेऱ्या सुरु होऊन प्रवेश निश्‍चिती करण्यास सुरुवात होईल. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २१ ऑक्‍टोबरची मुदत दिलेली आहे. थेट दसर्यापर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. वेळापत्रकात बदल झाल्‍यास कदाचित दिवाळीपर्यंतदेखील प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, डी. फार्मसीच्‍या नोंदणीला आधी सुरुवात झालेली असतांनादेखील गेल्‍या दोन महिन्‍यांपासून नोंदणीच सुरु आहे. त्‍यामुळे प्रवेश प्रक्रिया जैसे थे स्‍थितीत आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ११ सप्‍टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी मुदत दिली आहे. १६ सप्‍टेंबरला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित असून, हरकती नोंदविण्यासाठी १७ ते १९ सप्‍टेंबरची मुदत असेल. २० ला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यानंतर प्रवेश फेऱ्या पार पडतील. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार झालेला विलंब पाहता, डी. फार्मसीला तर नक्‍कीच दिवाळीपर्यंत प्रवेशाची प्रक्रियाच सुरु राहणार असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. कोट औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबल्‍याने विद्यार्थी, पालक महाविद्यालयांकडे चौकशी करत आहेत. त्‍यांची हतबलता लक्षात घेता, तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणांनी ही समस्‍या गांभीर्याने घ्यावी. - प्राचार्य डॉ.राजेंद्र भांबर, एमजीव्‍हीचे औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालय.
Marathi News Esakal
www.esakal.com