(पान एक अँकर)
---
NSK26H28506
नंदुरबार : विकासकामांची पाहणी करताना चौकशी समितीचे पदाधिकारी.
---
कोपर्ली ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी
पोलिस बंदोबस्तात समितीकडून दप्तरांची तपासणी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीतील अधिकाऱ्यांनी नुकतीच पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन विविध विकासकामे, निधीचा वापर, तसेच ग्रामपंचायत दप्तरातील कागदपत्रांची पाहणी केली. दरम्यान, चौकशी सुरू असतानाच भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह गावकरी व तक्रारदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
कोपर्ली ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार रवींद्र एकनाथ अहिरे आणि काही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
त्यानुसार सहायक गटविकास अधिकारी विजय पाटील, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, धडगाव येथील गिरीश खैरनार आणि विस्ताराधिकारी चंद्रकांत दशपुते यांच्या समितीने कोपर्ली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत चौकशी केली. चौकशीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयातील विविध विभागांमधील दप्तर, विकासकामांशी संबंधित कागदपत्रे, निधीचा वापर, तसेच तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
चौकशीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भामरे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू असताना ग्रामपंचायतीतील सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये विविध मुद्द्यांवरून शाब्दिक वाद आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. दरम्यान, या चौकशीचा अहवाल प्रशासनाकडे सादर झाल्यानंतरच तक्रारीतील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.
---
कोट
तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांप्रमाणे, तसेच इतर सर्व निधीचा संपूर्ण तपशील आणि ग्रामपंचायत दप्तर तपासणीतील मुद्द्यांसह समितीचे अधिकारी सखोल चौकशी करून आठ दिवसांत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करतील.
- उदयकुमार कुसुरकर,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, नंदुरबार