पान चार
---------------------
28504
नाशिक : आर्ट असोसिएट्सच्या संकल्पनेतून महाकवी कालिदास कलामंदिरात साकारलेल्या या प्रयोगाने उपस्थित रसिकांना कृष्णचरित्राची वेगळी अनुभूती दिली.
नाशिकमध्ये रंगला कृष्ण जन्मोत्सव सोहळा
कथ्थक, भरतनाट्यम आणि एआय तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : कृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडवत कथ्थक, भरतनाट्यम, संगीत, कथन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ साधणारा कृष्ण जन्मोत्सव सोहळा महाकवी कालिदास कलामंदिरात रंगला. आर्ट असोसिएट्सच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रयोगाने उपस्थित रसिकांना कृष्णचरित्राची वेगळी अनुभूती दिली.
कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांना समकालीन दृष्टिकोनातून सादर आर्ट असोसिएट्सने सादर केले.पुण्याच्या नादरूप संस्थेच्या कथ्थक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केला. विदुषी शमा भाटे यांच्या तालमीत तयार झालेल्या ११ तरुणी आणि एका तरुणाने कालिया दमन, माखन चोरी, गोपी वस्त्रहरण आदी प्रसंग नृत्याच्या माध्यमातून सादर केले. या प्रसंगांमधून कृष्णाचे विविध पैलू आणि त्यातून मिळणारा जीवनबोध उलगडण्यात आला.
अमीरा पाटणकर, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी आणि प्रमोद वाघ यांच्यासह कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केला. ‘कृष्ण द लिबरेटर’चे संगीत केदार पंडित यांनी केले असून सचिन खेडेकर यांच्या स्वरात होते. ध्वनी नियोजन पुष्कर जोशी, तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांनी केली. भरतनाट्यम गुरू शिल्पा देशमुख आणि त्यांच्या सृजनानंदच्या विद्यार्थिनींनी हा नृत्याविष्कार साकारला.
प्रारंभी दीपप्रज्वलन महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते झाले.
यावेळी ॲड. नितीन ठाकरे, डॉ. राज नगरकर, रश्मी हिरे, डीसीपी चव्हाण, शाहू खैरे, अजय बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील आणि रश्मी हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पेश कुलकर्णी यांनी केले.