RVR26B04963 : डॉ. उमेश पाटील
---
RVR26B04964
रावेर : डॉ. उमेश पाटील यांनी तयार केलेले ‘चेस्ट पॅड’
---
रावेर येथील प्राध्यापकाच्या
‘चेस्ट पॅड’ला पेटंट
सकाळ वृत्तसेवा
रावेर, ता. ७ ः येथील (कै.) व्ही. एस. नाईक वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. उमेश पाटील यांच्या क्रिकेट खेळातील ‘चेस्ट पॅड’ या क्रीडा साहित्याची नोंदणी बौद्धिक संपदा विभागाकडून झाली असून, त्याचे ‘पेटंट’ डॉ. पाटील यांच्यासह सहकारी डॉ. रामहरी नागटिळक (बार्शी) यांच्या नावावर नोंदविले आहे.
डॉ. पाटील क्रीडा प्रकारात विविध प्रयोग करीत असतात. बार्शी येथील क्रिकेट ॲकॅडमीचे कोच डॉ. नागटिळक यांच्यासोबत त्यांनी क्रिकेटमध्ये फलंदाजासाठी एक ‘चेस्ट पॅड’ संयुक्तपणे डिझाईन केले. फलंदाजी करताना अगदी बनियानसारखे असलेले ‘चेस्ट पॅड’ फलंदाजाने परिधान केल्यावर विविध प्रकारचे चेंडू खेळताना खेळाडूची हालचाल जाणून घेईल. कोणत्या प्रकारच्या हालचाली करताना फलंदाजाला अडचणी येतात व कोणत्या प्रकारचे चेंडूंना तो कसा सामोरा जातो, याच्या नोंदी ‘चेस्ट पॅड’ घातल्यानंतर होणार आहेत. याचा फायदा त्या फलंदाजाला त्याच्यातील त्रुटी शोधून उपाय करण्यासाठी होणार आहे. ‘चेस्ट पॅड’ परिधान केल्यावर त्यातील अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरण जाणवणारही नाही. खेळाडूंची सुरक्षितता, स्वदेशी तंत्रज्ञान या गोष्टी लक्षात घेऊन हे पॅड तयार करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आता हे पेटंट आमच्या नावावर झाल्याने लवकरच ‘चेस्ट पॅड’चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून स्थानिक स्पर्धांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा वापर होईल, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. उमेश पाटील यांच्या नावाने हे ‘पेटंट’ सुरक्षित झाल्याने महाविद्यालयाच्या नावलौकिकातही भर पडली आहे. संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईक आणि प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राध्यापक व संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले.