नेपाळमधून परतलेल्या
२०० यात्रेकरूंचे स्वागत
श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे चोख नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : नेपाळमध्ये उद्भवलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सर्व २०० यात्रेकरू सुखरूप परतले. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या चोख नियोजनामुळे आणि सेवेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्व भाविक सुरक्षित नाशिकला परतले. त्यांच्या आगमनानंतर मुंबई नाका येथे मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.१) सकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी श्री दत्त महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टतर्फे दरवर्षी भाविकांसाठी अत्यल्प दरात दत्त महाराजांच्या पादुकांसह तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाही २०० यात्रेकरू नेपाळ यात्रेला गेले होते. नेपाळमध्ये अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवून जनजीवन विस्कळित झाल्याने यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंडळाच्या सेवेकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत भाविकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली.
या यात्रेत लहान मुलांपासून वयोवृद्ध आजी-आजोबांचाही सहभाग होता. सर्व भाविक सुखरूप परतल्याने त्यांच्या स्वागतासाठी मुंबई नाका येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला. अध्यक्ष भूषण सुधाकर काळे यांनी सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले.
यावेळी श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष काळे, सचिव गणेश कानडे, निशांत थोरात, किरण चौधरी, हेमंत काकड यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते.