NSK26H28517
नंदुरबार : आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी. शेजारी डॉ. एम. एस. रघुवंशी, डॉ. एम. आर. पाटील, डॉ. स्वप्नील मिश्रा आदी.
---
आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी
बँकिंग ज्ञान आत्मसात करावे : डॉ. रघुवंशी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी बँकिंगविषयक मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. डिजिटल युगात बँकिंग सेवांचा वापर करताना आर्थिक शिस्त व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात बँकिंगचे महत्त्व, बचत खात्याची आवश्यकता, सुरक्षित आर्थिक व्यवहार आणि आधुनिक बँकिंग सेवांचा योग्य वापर याबाबत त्यांनी माहिती दिली.
येथील ग. तू. पाटील महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार फिनेक्सेस संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी वित्तीय व आर्थिक साक्षरता कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते जितेंद्र पाटील यांनी, बचत खाते, ई-केवायसी, डिजिटल बँकिंग, ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी उपस्थितांना अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण, तसेच नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास उपलब्ध विमा संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती व त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. स्वप्नील मिश्रा यांनी प्रस्तावना केली. डॉ. नेहा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गायत्री रघुवंशी, प्रा. पूजा ठाकरे, प्रा. पिनल परदेशी, प्रा. शैलेश परदेशी, डॉ. डी. डी. गावित, प्रा. सचिन दातिर, प्रा. दारासिंग वळवी आणि प्रा. संग्राम पाडवी यांनी सहकार्य केले.