टुडे एक ॲंकर
(पारिचारीका रुग्ण सेवा करते आहे असा एआय फोटो घ्यावा)
-------
कर्मचारी, कुटुंबांना शासकीय रुग्णालयातच उपचार सक्तीचे
जिल्हा शल्यचिकित्सक सांगळे : आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, इतर शासकीय आरोग्य संस्थांमधील नियमित अधिकारी व कर्मचारी, वर्ग-१ ते ४ मधील कर्मचारी यांनी स्वतःसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांनाही शासकीय रुग्णालयांतच उपचार घेणे आता बंधनकारक राहणार आहे, असा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतल्याची माहिती डॉ. स्वप्नील सांगळे यांनी दिली.
कर्मचारी व अधिकारी यांनी स्वत:सह कुटुंबांच्या आजारपणाच्या उपचारासाठी, ज्या आरोग्यसेवा, वैद्यकीय तपासण्या, निदान सुविधा व उपचार पद्धती संबंधित शासकीय आरोग्य संस्थेत उपलब्ध आहेत, त्या सेवा प्राधान्याने त्याच शासकीय आरोग्य संस्थेमधून वा इतर शासकीय आरोग्यसंस्थेमधून घेणे बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना दर्जेदार, तत्पर, गुणवत्तापूर्ण व सन्मानपूर्वक रुग्णसेवा उपलब्ध करून देणे, रुग्णालय परिसरात उच्चदर्जाची स्वच्छता राखणे, रुग्णांना नियमानुसार पौष्टिक व गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देणे, संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकीय सेवा व तपासण्या पूर्णक्षमतेने कार्यान्वित ठेवणे, ही संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता व प्रशासकीय जबाबदारी आहे.
------
..तर प्रतिमा उंचावेल
अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः शासकीय आरोग्य संस्थांमधील उपलब्ध उपचार व तपासणी सुविधांचा लाभ घेतल्यास, त्याचा सकारात्मक संदेश समाजात जाऊन शासकीय रुग्णालयांची प्रतिमा व विश्वासार्हता अधिक उंचावण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे शासकीय आरोग्यसंस्थेत संबंधित उपचार, तपासणी अथवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध असताना, केवळ सोयीच्या कारणास्तव अथवा अन्य कारणाने खासगी रुग्णालय, खासगी आरोग्य संस्थेत उपचार घेण्याचे टाळावे व उपलब्ध शासकीय सुविधांचा प्राधान्याने लाभ घ्यावा.
------
चौकट
वैद्यकीय परिपूर्ती मंजूर होणार नाही
अतितत्काळ परिस्थिती सोडून शासकीय आरोग्य संस्थेत उपलब्ध उपचारपद्धती, तपासणी अथवा इतर वैद्यकीय सुविधा खासगी रुग्णालयांतून घेतल्यास अशा खर्चाचे वैद्यकीय परिपूर्ती देयक या कार्यालयाकडून मंजूर करण्यात येणार नाहीत. शासकीय आरोग्यसंस्थेत संबंधित सुविधा उपलब्ध असूनही खासगी संस्थेत उपचार घेतल्यास त्या खर्चाची वैद्यकीय परिपूर्ती अनुज्ञेय असल्याचा कोणताही हक्क संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यास राहणार नाही.
----
कोट
NSK26H28456 (डॉ. स्वप्नील सांगळे)
शासकीय रुग्णालयांत उपलब्ध सुविधांचा अधिकाधिक वापर होऊन त्यांचा दर्जा उंचावणे, नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ करणे व दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्यसेवा, ही शासकीय आरोग्य व्यवस्थेची ओळख निर्माण करणे, हा या कार्यालयाचा प्रमुख उद्देश आहे.
- डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.