NSK26H28524
जळगाव : श्री गर्जना मित्रमंडळाची संगमरवरी श्री गणरायाची आकर्षक मूर्ती.
----
संगमरवरी गणरायाची दशकभराची परंपरा
श्री गर्जना मित्र मंडळ साकारतेय केशवनाथेश्वर मंदिराची हुबेहुब आरास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : भक्तिमय देखावे आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीच्या परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवीपेठेतील श्री गर्जना मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव २०२६ जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मंडळाच्या माहितीनुसार, जळगावातील एकमेव गणेश मंडळ म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून जयपूर येथून तयार करून घेतलेल्या संगमरवरी श्रींच्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. यंदा या परंपरेचे दहावे वर्ष असून, भाविकांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
दरवर्षी वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानांची हुबेहुब आरास साकारण्याची मंडळाची परंपरा आहे. यापूर्वी वैष्णोदेवी, पशुपतीनाथ, द्वारका आदी देवस्थानांच्या आरासी साकारण्यात आल्या आहेत. यंदा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कराडी गावातील केशवनाथेश्वर मंदिराची आरास साकारण्यात येणार आहे.
महादेवाला समर्पित असलेले हे मंदिर गुहेत असून, दर्शनासाठी भाविकांना पाण्यातून जावे लागते. गुहेत नैसर्गिकरीत्या प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग असल्याची श्रद्धा आहे. वर्षभर पाण्याने भरलेल्या या गुहेत गुडघ्यापासून कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत भाविक दर्शन घेतात. याच वैशिष्ट्याचा प्रत्यक्ष अनुभव जळगावातील भाविकांना देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
चौकट
मंडळाची अशी आहे कार्यकारिणी
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी रिकू चौधरी, उपाध्यक्ष योगेश सोनवणे, सचिव सागर पाटील, खजिनदार सागर व्यास, तर सल्लागार म्हणून कुणाल मेतकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य म्हणून मुकेश पाटील, शैलेश अभंगे, ॲड. अविनाश महिरे, अमोल जैन, महेश कापसे, दीपक सोनवणे, चेतन मालुसरे आणि हितेश रवींद्र जावळे कार्यरत राहणार आहेत.