(मनपा इमारतीचा फोटो वापरता येईल)
---
मनपा कर्मचाऱ्यांचे एक तारखेलाच पगार
आयुक्तांच्या प्रयत्नांनी अनेक वर्षांनंतर दिलासा; करवसुलीला वेग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : गेल्या पाच ते सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार जमा झाला आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार १ सप्टेंबरलाच झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आर्थिक अडचणींच्या काळात वेळेवर वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून बिकट राहिली आहे. उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापना खर्च, विविध विकासकामे आणि प्रशासकीय खर्चाचा ताळमेळ साधताना प्रशासनाची दमछाक होत होती. परिणामी काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन एक ते दोन महिन्यांनी रखडण्याच्या घटना घडत होत्या. त्यानंतर परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली तरी पगाराची तारीख निश्चित राहिलेली नव्हती. दर महिन्याला पगार होत असला तरी तो अनेकदा १० तारखेनंतरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत असे.
उशिरा पगारामुळे अडचण
पगाराला होणाऱ्या विलंबाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अर्थकारणावर होत होता. गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्जांचे हप्ते तसेच घरखर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क यांचे नियोजन बिघडत होते.
उत्पन्नवाढीवर भर
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून आयुक्त आदित्य जिवने यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. थकीत मालमत्ता कराची वसुली, व्यापारी संकुलातील गाळेभाडे व इतर करांची वसुली, पाणीपट्टी तसेच विविध परवाने व शुल्कांच्या माध्यमातून महसूल वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. थकीत देयकांच्या वसुलीसोबतच प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळेभाडे, बांधकाम परवाने व विकास शुल्क, जाहिरात शुल्क, विविध परवाने आणि इतर सेवा शुल्कांच्या वसुलीला गती देण्यात आल्याने महसूल प्रवाह सुधारण्यास मदत होत आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करण्याला प्राधान्य देणे शक्य झाले आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांमधून समाधान
महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियमित आणि वेळेवर वेतनाची ही पद्धत कायम राहावी, अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.