रिमझिम पावसानंतर ‘ब्रेक’; ढगाळ वातावरण
(उपशीर्षक)
अधूनमधून सूर्यदर्शन; शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (ता.१) झालेल्या रिमझिम पावसाने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा दिला होता. त्यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतला आहे. मंगळवारपासून असलेले ढगाळ वातावरण आजदेखील कायम असून, अधूनमधून सूर्यदर्शन होत आहे. समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या दीर्घ उघडीपमुळे खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यातच मंगळवारी (ता.१) सकाळी पावसाचे आगमन झाले होते. थोडा वेळ झालेल्या रिमझिम सरींमुळे काही प्रमाणात कोमेजत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. दरम्यान, दमदार पाऊस होणार अशी अपेक्षा असताना पावसाने पुन्हा गायब झाला आहे. पिकांसाठी दमदार पावसाची आवश्यकता कायम आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण
दरम्यान, कालपासून (ता.१) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून आज सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी दिसून येत आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. काही भागांत हलक्या सरी पडल्या असल्या तरी जिल्हाभरात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
चौकट
पावसाचा अंदाज अन् हुलकावणी
रिमझिम सरींनंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली असली, तरी ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या आशा कायम आहेत. दरम्यान जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याचा प्रत्यय येत आहे. यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी आणि नागरिकांना लागून आहे.