लॅब असिस्टंट ते ‘शालार्थ’चा एजंट साळुंकेला बेड्या

लॅब असिस्टंट ते ‘शालार्थ’चा एजंट साळुंकेला बेड्या
Published on
लॅब असिस्टंट ते ‘शालार्थ’चा एजंट साळुंकेला बेड्या शालार्थ आयडी घोटाळा : २३ कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शिक्षण विभागातील बडे अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक आणि मध्यस्थांच्या (एजंट) साखळीने कट रचून राबवलेला १६० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळा प्रकरणाची व्याप्ती अत्यंत गंभीर व क्लिष्ट वळणावर पोहोचली आहे. या महाघोटाळ्यात आणखी एका संशयित एजंट तुषारकुमार उखाजीराव साळुंके (३८, रा. शेवाळी, ता. साक्री, जि. धुळे) याला शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर (जि. धुळे) येथून अटक केली आहे. नाशिक न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत (ता. ७) पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित साळुंके व त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ प्रणालीत घुसखोरी करून शासनाची १६० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. हे कृत्य नियोजनबद्ध व संघटितरीत्या केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात बीएनएस कलम १११ च्या संघटित गुन्हेगारीचे हे वाढीव कलम लावले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके तपास करीत आहेत. लॅब असिस्टंट ते एजंट संशयित तुषार साळुंके साक्रीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब असिस्टंट) म्हणून नोकरीला आहे. त्याच शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचाही या गुन्ह्यात सहभाग उघड झाला आहे. साळुंके याने यापूर्वी अटक केलेला एजंट प्रशांत वाडिले याच्याशी संगनमत करून शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी व अधिकाऱ्यांना मोठ्या आर्थिक रकमा देत बेकायदेशीरपणे सुमारे २३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक शालार्थ आयडी मान्यता आदेश मिळवून दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. जावक नोंदवहीत खाडाखोड धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अहवालानुसार, संशयित साळुंकेने शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तयार करताना जि. प. कार्यालयातील जावक क्रमांकाच्या मूळ रजिस्टरमध्येच खाडाखोड केली आणि त्यामध्ये बनावट क्रमांक घुसविल्याचे निदर्शनास आले आहे. या बनावट वैयक्तिक मान्यता आदेशांच्या आधारे ऑनलाइन ‘शालार्थ प्रणाली’त नावे समाविष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले बनावट शालार्थ आदेश व इतर कागदपत्रे तयार केली. या बनावट शालार्थ आयडीच्या आधारे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व नियमित पगार मंजूर करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांशी संगनमत संशयित साळुंके व प्रशांत वाडिले यांनी बनावट शालार्थ आयडी प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे व मीनाक्षी गिरी यांना मोठ्या रकमा दिल्या आहेत. त्यांच्याशी संगनमतानेच संशयितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करून वेतन मंजूर करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. या शाळा रडारवर -​ दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळांतर्गत वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय, तावखेडे येथील शिक्षकेतर कर्मचारी धर्मराज कोळी, इंदिरा गांधी हायस्कूल, कर्ले येथील शिक्षक देवरे गजानन यांच्या तत्कालीन वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांच्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन मंजूर करून घेतले. - देवपूर (धुळे) येथील जय योगेश्वर शिक्षणप्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल, शिरडाणेमधील तीन शिक्षकांची वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना लाच देऊन नियमबाह्य पद्धतीने करून घेतली. - ​बुरझाड येथील जनता विकास मंडळांतर्गत (कै.) भाऊसाहेब पी. आर. पाटील शाळेतील दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे याला आर्थिक मोबदला देऊन मिळवली. -​पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) अ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर मान्यता आदेश प्रवीण अहिरे याच्याकडून प्राप्त केले. - विधायक समिती, पिंपळनेर येथील (कै.) एन. एस. पी. पाटील माध्यमिक विद्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांची मान्यता तुषार साळुंके याने प्रवीण अहिरे याला लाच देऊन बेकायदेशीररीत्या मिळवली. यासाठी घेतली कोठडी संशयित साळुंके यास नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता शालार्थ आदेशासाठी बनावट कागदपत्रे कोठे तयार केली, जिल्हा परिषद धुळेच्या शिक्षण विभागातील रजिस्टरमध्ये घुसखोरी कशी केली, साक्रीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील गुन्ह्यात सहभागी दोन कर्मचाऱ्यांची चौकशी, किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संशयितांनी वेतन मंजूर करून देत शासनाची फसवणूक केली याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ७ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com