फोटो : NSK26H28548
नंदुरबार : प्रदर्शनात प्रकल्पांचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.
-------------------
ढोंगसागाळी एकलव्य विद्यालयाच्या
तीन प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड
नंदुरबार, ता. ४ : नुकत्याच पार पडलेल्या क्लस्टरस्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात नंदुरबार जिल्ह्यातील ढोंगसागाळी येथील शासकीय एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेच्या तीन प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य अनिल मंगळे यांनी दिली. या प्रदर्शनात ज्युनिअर गटात दिया सायसिंग पाडवी आणि रियान निलेश वसावे यांनी सादर केलेल्या ‘कृषीतील स्वयंचलन’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.
नाशिक जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, पिंपरी सद्रो (ता. इगतपुरी) येथे हे प्रदर्शन पार पडले. ‘कृषीतील स्वयंचलन’ कार्यरत मॉडेलमध्ये सौरऊर्जा, स्वयंचलित सिंचन, पाण्याची बचत, सेन्सर- आधारित सूचना आणि आधुनिक पीक संरक्षण यांसारख्या संकल्पनांचा एकत्रित वापर दाखविण्यात आला होता. गणित विभागात सुजिता अरविंद गावित आणि नूतन भरत पावरा यांच्या ‘त्रिकोणमिती उद्यान’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळवला. त्रिकोणमितीच्या किचकट संकल्पना प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी जोडून अत्यंत सोप्या व रंजक पद्धतीने मांडण्यात आला होता. तर सीनियर गटात अरमान राजन वळवी आणि वैभव रवींद्र पाडवी यांच्या ‘शाश्वत ग्राम’ या प्रकल्पाने सहावा क्रमांक पटकावला. शाश्वत विकास, संसाधनांचा समतोल वापर आणि पर्यावरणपूरक ग्रामरचना यावर हा प्रकल्प आधारित होता. शाळेने सादर केलेल्या ‘कृषीतील स्वयंचलन’, ‘त्रिकोणमिती उद्यान’ आणि ‘शाश्वत ग्राम’ या तिन्ही प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक शिवानी दीक्षित, वडमारे सुबोध जिजा, भुरू चौधरी आणि विशाल कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य श्री. मंगळे यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.