धुळे : टुडे पान ३ साठी... अवतीभवती
--
शिंदखेड्यात शनिवारी
शिक्षक गौरव सोहळा
शिंदखेडा : भारतीय जैन संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. ५) शिक्षक दिनानिमित्त शिंदखेड्यातील जैन स्थानक, रथ गल्ली येथे सकाळी दहाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या प्राध्यापक व शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकारात्मक मूल्यांना सशक्त बनवणे आणि शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास सत्कारमूर्ती, शिक्षक, प्राध्यापक, समाजबांधव व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानदेश अध्यक्ष चंद्रकांत डागा, सचिव अशोक राखेचा आणि शहराध्यक्ष मयूर ओस्तवाल यांनी केले आहे.
---
देवकर विद्यालयात
वृक्षांना बांधल्या राख्या
धुळे : विरदेल (ता. शिंदखेडा) येथील देवकर विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणातील तुळस, वड, पिंपळ, नीम, अशोक, चाफा, पारिजात, गुलमोहर, सुबाभूळ आदी वृक्षांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून वृक्षरक्षणाचा संकल्प केला. मुख्याध्यापक जे. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक एस. एस. गोसावी व सांस्कृतिक विभागप्रमुख आर. एच. ठाकूर उपस्थित होते. दहावीच्या गाइड विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक व सुंदर राख्यांचा वापर करण्यात आला. गाइड कॅप्टन ज्योती निकवाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियंका शिंदे यांनी आभार मानले.
---
शहरात दोनदिवसीय
वीणकाम कार्यशाळा
धुळे : शहरातील युवती मंडळातर्फे पांझरा काठावरी अग्रवाल विश्राम भवनात दोनदिवसीय विणकाम कार्यशाळा घेण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रेया अग्रवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यशाळेला युवतींकडून चांगला प्रतिसाद लाभला. दोनदिवसीय कार्यशाळेत ६० पेक्षा अधिक युवतींनी सहभाग घेतला. सहभागी युवतींनी विणकामाचे सैद्धांतिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण नीती अग्रवाल, प्रियंका अग्रवाल यांनी दिले. कार्यशाळेतून युवतींना हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. युवती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रेया अग्रवाल, उपाध्यक्षा नीती अग्रवाल, सचिव दिया अग्रवाल, हिमांशी असावाल, खुशी उसावाल, भक्ती गिंदोडिया यांनी सहकार्य केले.