म्हाडा प्रकरणी महसुलचे चौघे निलंबित
विभागीय आयुक्तांची कारवाई; प्रशासनात खळबळ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबितांमध्ये एका मंडलाधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही कारवाई केली असून, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
राज्यभर गाजलेल्या म्हाडा प्रकरणात एकीकडे न्यायालयीन कारवाई सुरू असताना, राज्य सरकारच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान जिल्हा प्रशासनातील चौघा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सकृतदर्शनी सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन मंडलाधिकारी तसेच सध्या पिंपळगाव बसवंत येथे कार्यरत असलेले अनिल रोकडे यांचा समावेश आहे. तसेच सध्या मोहाडी येथे नियुक्त असलेल्या तलाठी मनिषा पाटील, गंगापूरचे तलाठी नितीन चिताळकर आणि नाशिक शहर-१ येथील तलाठी सागर शेलार यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांच्या चौकशीत मनिषा पाटील यांच्याशी संबंधित सर्वाधिक १६ केसेस आढळून आल्या आहेत. नितीन चिताळकर आणि सागर शेलार यांचा अनुक्रमे सहा आणि एका केसमध्ये सहभाग दिसून आल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे डॉ. गेडाम यांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
म्हाडा प्रकरणात यापूर्वी दोघा मंडलाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट चौघा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणातील प्रशासनाची भूमिका अधिक कठोर झाल्याचे मानले जात आहे. निलंबन कालावधीत संबंधित चौघा अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपले दफ्तर जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
म्हणून उगारला कारवाईचा बडगा
म्हाडा प्रकरणी तीन ते चार स्तरांवर चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या चौकशीला विशेष महत्त्व आहे. चौकशीच्या कोणत्याही बाबींवर संबंधितांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडू नये, या उद्देशाने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.