धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो- NSK26H28579, NSK26H28580
धुळे ः शहरात विविध ठिकाणी लावलेल्या अनधिकृत बॅनर्सचा ऑनलाइन पंचनामा करताना महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी.
---
अनधिकृत बॅनरबाजांना ६७ लाखांच्या दंडाच्या नोटिसा
धुळे महापालिकेचा ऑनलाइन पंचनाम्यातून दणका; शहरात ४६ ठिकाणी पंचनामे
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग, बॅनर व जाहिरातबाजांवर धुळे महापालिकेने आता अत्याधुनिक ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट जागेवरच दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे अनधिकृत बॅनरची स्थळ पाहणी, पंचनामा, दंड निश्चिती आणि संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग व बॅनरची प्रत्यक्ष जागेवर स्थळपाहणी करून नियुक्त चार क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाइन पंचनामा करण्यात येत आहे. स्थळपाहणीच्या वेळी बॅनरचा लाइव्ह फोटो, बॅनरवरील मजकूर व आवश्यक माहिती ऑनलाइन प्रणालीवर अपलोड केली जाते. त्यानंतर पंचनामा पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीचा नियमानुसार दंड निश्चित करून संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक नोटीस बजावली जाते.
६७ लाखांच्या दंड नोटिसा
अद्ययावत प्रणालीच्या माध्यमातून आत्तापर्यंत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एकूण ४६ अनधिकृत होर्डिंग-बॅनरचे ऑनलाइन पंचनामे करण्यात आले आहेत व संबंधितांना एकूण ६७ लाख १५ हजार ६६० रुपये रकमेच्या दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दंडात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या व्यक्ती व संस्थांकडून महापालिका अधिनियमानुसार दंड वसुलीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत ऑनलाइन प्रणालीद्वारे तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात येणाऱ्या बॅनर परवानगीचे ८६ हजार रुपये मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
सहकार्य करा, कारवाई टाळा
शहरातील रस्ते, चौक, वीजखांब, तसेच सार्वजनिक ठिकाणांचे अनधिकृत जाहिराती व बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने अद्ययावत ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग-बॅनर लावणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. अनधिकृत जाहिराती व बॅनर लावणे टाळून शहराच्या सौंदर्यीकरणास सहकार्य करावे आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन धुळे महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.