धुळे ः टुडे १ साठी, मेन
---
फोटो क्रमांक ः 28583
शेलबारी ः वनांचल विज्ञान केंद्राचे सुरू असलेले काम.
---
शेलबारीत राज्यातील पहिले वनांचल विज्ञान केंद्र
धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आदिवासी युवकांना कौशल्य, रोजगाराची संधी
भिलाजी जिरे ः सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. २ ः आदिवासी व वनक्षेत्रांच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) वन विभागांतर्गत शेलबारी वनक्षेत्रात राज्यातील पहिल्या वनांचल विज्ञान प्रशिक्षण केंद्राची उभारणी सुरू आहे. छत्तीसगडनंतर देशातील अशा प्रकारचे हे दुसरे प्रायोगिक केंद्र असून, धुळे जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार २५ एकर वनभूखंडापैकी सध्या अडीच एकर क्षेत्रावर प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे.
आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन वनसंवर्धन, कृषी-वनीकरण, औषधी वनस्पती, बांबू प्रक्रिया, गौण वनउपजांचे मूल्यवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्ष निवारण या विषयांवर येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक संपत्तीचा योग्य वापर करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले जातील, ज्यामुळे आदिवासी युवक-महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
वैशिष्ट्ये व नियोजन
वैज्ञानिक उपाययोजना- वनवे, अतिक्रमण आणि मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण व जनजागृती केली जाईल. कायदेशीर चौकट- हे केंद्र वनहक्क कायदा व पेसा कायद्याच्या चौकटीत कार्यरत राहून संशोधनाला सहाय्य आणि पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करेल. आर्थिक व तांत्रिक सहकार्य- सीएएमपीए निधी, आंतरराष्ट्रीय अनुदान आणि सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल. तसेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या (जशपूरनगर) मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प चालविला जाईल. प्रशासन व सहभाग- केंद्र चालविण्याची जबाबदारी वन विभागाकडे राहणार असून, प्रत्येक केंद्रासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले जातील. तसेच ग्रामसभा आणि जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचा यात सक्रिय सहभाग असेल.
उपाय सूचवू ः ढोल
शेलबारीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर वनव्याप्त व आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अशा केंद्रांचा विस्तार केला जाणार असून, वनसंवर्धन आणि कौशल्यविकासाचा हा महत्त्वाचा संगम ठरणार आहे. यासंदर्भात वन परिक्षेत्रपाल ओंकार ढोल यांनी सांगितले, की वनांचल विज्ञान प्रशिक्षण केंद्राचे काम प्रादेशिक वन विभागांतर्गत सुरू आहे. वन जमिनीवरील वनवे व अतिक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचविले जातील. पर्यावरणाच्या दृष्टीने वनसंरक्षण व संगोपन करण्यासाठी या केंद्रामुळे मोठी चालना मिळणार आहे.
---
१४-१
कोट
फोटो क्रमांक ः 28584
देशातील प्रायोगिक तत्त्वावरील हे दुसरे, तर महाराष्ट्रातील पहिलेच वनांचल विज्ञान प्रशिक्षण केंद्र आहे. आदिवासी समाजाचे पिढ्यान्पिढ्या जतन झालेले पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांची सांगड घालून स्थानिक समुदायाला सक्षम करणे, वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करणे आणि रोजगाराच्या स्थानिक संधी निर्माण करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
- पद्मश्री चैत्राम पवार,
शिल्पकार, आदर्श बारीपाडा