रागाने निघून गेलेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे पोलिसांनी लावला शोध

रागाने निघून गेलेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे पोलिसांनी लावला शोध
Published on
रागाने गेलेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे पोलिसांनी लावला शोध सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ४ ः वडिलांच्या कडक स्वभावामुळे इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणारा तालुक्यातील विद्यार्थी रागाच्या भरात घरातून निघून गेला. रेल्वेस्थानकावरील ‘सीसीटीव्ही फुटेज’चे पाहून येथील रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी ढगे यांनी त्याचा शोध घेतला. त्याची समजूत काढून त्याला आईवडिलांच्या स्वाधीन केले. तालुक्यातील एका गावातील विद्यार्थी चाळीसगावला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचा आणि वडिलांचा नेहमी वाद व्हायचा. वादामुळे विद्यार्थी बॅग घेऊन निघाला व त्याने येथील रेल्वेस्थानक गाठले. स्थानकावर आल्यानंतर त्याने बहिणीला मोबाईलवरून मेसेज पाठवला, की ‘मी स्थानकाजवळ स्कूटी लावली आहे. माझा तपास करू नका, मी आता परत घरी येणार नाही’ हा मेसेज वाचल्यानंतर बहिणीने मावस भावाला कळविले. काही वेळातच त्या विद्यार्थ्याचे नातलग चाळीसगाव रेल्वेस्थानकावर आले. रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक शुभांगी ढगे यांना घडलेला प्रकार सांगितला. क्षणाचाही विलंब न करता शुभांगी ढगे यांनी रेल्वेस्थानकावरील ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहिले. स्थानकावर आलेल्या सचखंड एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये बसल्याचे दिसून आले. गाडीत बसल्यानंतर बंद केलेला त्याचा मोबाईल त्याने काही वेळ सुरू केला व पुन्हा बंद केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सचखंड एक्सप्रेस बऱ्हाणपूरपुढे गेली होती. त्यामुळे एपीआय ढगे यांनी खंडवा रेल्वे पोलिसांना विद्यार्थ्याचे फोटो, मोबाईलचे लोकेशन आदी तांत्रिक माहिती पाठविली. खंडवा रेल्वे पोलिसांनी रेल्वेतील डब्यांचा शोध घेतला असता, संबंधित विद्यार्थी त्यांना मिळून आला. तेथील पोलिसांनी त्याचे व शुभांगी ढगे यांचे मोबाईलवरून बोलणे करून दिले. आपण रागाच्या भरात निघून गेल्याचे सांगत पुन्हा असे आता करणार नाही, असे ढगे यांना सांगितले. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
Marathi News Esakal
www.esakal.com