धुळे ः टुडे ३ साठी, सुधारित बातमी
---
फोटो ओळ व फोटो तोच ठेवावा................फक्त हेडिंगपासून सर्व मजकूर खालील घ्यावा.
---
कागदाच्या १८ फुटी गणरायाची प्रतिष्ठापना
धुळ्यातील वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः विधायक कार्यासाठी संघटित झालेल्या साडेतीनशेहून अधिक तरुणांच्या सहभागातून देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरातील राज्य शासन पुरस्कारप्राप्त वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी सभामंडप उभारणीच्या कामाचा बुधवारी (ता. २) श्रीफळ वाढवून भक्तिभावात प्रारंभ करण्यात आला.
वंदे मातरम् प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभियंता श्यामकांत बोरसे, गिरीश मराठे, हरिश चौधरी, उमाकांत पाटील, नितीन पाटील, नीलेश राजपूत, डॉ. हेमंत भदाणे, प्रदीप पाटील, समीर पाटील, यशवंत पाटील, बंटी पाटील, गिरीश पाटील, सुशील बोरसे, डॉ. योगेश ठाकरे आदी उपस्थित होते. डीजेचा कर्णकर्कश दणदणाट टाळत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच तब्बल १८ फुटांची कागदापासून साकारलेली भव्य गणेशमूर्ती यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. यातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श या निमित्ताने घातला जात आहे.
वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. यंदाच्या उत्सवातही शाडूच्या गणेशमूर्तीनिर्मिती कार्यशाळा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा आणि मोदक स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जातील. परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सानिध्यात वर्दळ असणाऱ्या या भागात महिला व तरुणींच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रतिष्ठानने लोकसहभागातून चौकाचौकांमध्ये ६४ पेक्षा अधिक आयपी (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प स्थानिक पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरला आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बोरसे यांनी सांगितले.