धुळे ः टुडे १ साठी
---
‘एसआयआर’मधून ७० टक्के हिंदू नावे बाद
शिवसेने (उबाठा)चा दावा ः ३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आरोप करत या प्रक्रियेत सुमारे ७० टक्के हिंदू मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा येथील शिवसेना (उबाठा) पक्षाने पत्रकाद्वारे केला आहे. यामुळे ही प्रक्रिया हिंदू मतांच्या मुळावर घाला घालणारी ठरल्याचा गंभीर आक्षेप या पक्षाकडून घेण्यात आला आहे. यात ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत, असे आवाहन पक्षाने केले आहे.
पक्षाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी म्हटले आहे, की प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी धुळे शहर मतदारसंघात एकूण तीन लाख ६५ हजार ७७३ मतदार होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाच्या फॉर्म २० मधील अंतिम निकालाच्या पत्रावर हीच संख्या तीन लाख ६४ हजार ७७१ इतकी नोंदवली गेली. या निवडणुकीत एकूण दोन लाख २० हजार ५०१ मतदान झाले होते, तर एक लाख ४४ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नव्हता. अलीकडेच ३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत मतदारसंघाची एकूण संख्या दोन लाख ६३ हजार ८०० वर आली आहे. म्हणजेच एसआयआर प्रक्रियेतून तब्बल एक लाख एक हजार ९७३ मतदार वगळले गेले आहेत. मृत, दुबार आणि स्थलांतरित नावांचा यामध्ये भरणा असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात येत आहे.
हिंदू मतदारांवर परिणाम
मतदारसंघातील २८८ बूथनिहाय हिंदू आणि मुस्लिम रहिवास क्षेत्रांची गोळाबेरीज केल्यास एसआयआर प्रक्रियेत कमी झालेल्या एक लाख एक हजार ९७३ मतदारांपैकी तब्बल ७० टक्के हिंदू, तर ३० टक्के मुस्लिम मतदार कमी झाल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम भागात ९० टक्के मतदारांनी प्रक्रियेत सहभाग नोंदवला, मात्र हिंदू मतदारांचा सहभाग या तुलनेत कमी राहिल्याने हा फटका बसल्याचे बोलले जात आहे. या प्रक्रियेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी मुस्लिम मतदारांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, प्रत्यक्षात हिंदू मतांबाबत उलटा प्रकार घडल्याने आणि बीएलएच्या (बूथ लेव्हल एजंट) माध्यमातून झालेला प्रचार आता सत्ताधाऱ्यांच्याच अंगलट आल्याची चर्चा आहे. धुळे शहरात अद्यापही सात ते आठ हजार मतदारांचे मॅपिंग न झाल्याने मतदार हवालदिल झाले आहेत, असे श्री. पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.