(युडे पान एक मेन लिड ---कृपया दोन्ही फोटो घ्यावेत..)
---
NSK26H28591/ NSK26H28593
नंदुरबार : रक्तदान करताना जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप. दुसऱ्या छायाचित्रात रक्तदान करताना पोलिस कर्मचारी.
---
पोलिस दलातर्फे रक्तदान शिबिर
जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले रक्तदान
नंदुरबार, ता. २ : येथील पोलिस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विशेष जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्वत: रक्तदान करून आदर्श निर्माण केला. या वेळी त्यांनी महिलांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रक्तदान हे महान कार्य असून, आपण केलेल्या रक्दानामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकतात, असे त्या म्हणाल्या.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त संकलन केंद्र कार्यान्वित आहे. जिल्ह्यात एकच शासकीय रक्तकेंद्र असल्याने सर्वच रुग्णांना रक्तपिशव्या पुरविणे अडचणीचे होते. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे सतत आयोजन करण्यात आले, तर जास्तीत जास्त रुग्णांना रक्त पिशव्यांचा पुरवठा करणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले होते. त्यानुसार पोलिस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन शिबिरात सहभाग नोंदविला.
शहरातील जिल्हा रुग्णालयात दररोज विविध आजाराचे रुग्ण रक्त संक्रमणासाठी दाखल केले जातात. सदर रक्त केंद्रामार्फत गोरगरीब व गरजू रुग्णांना रक्तपिशव्या पुरविल्या जातात. समाजातील सिकलसेल, थॅलेसिमिया, कुपोषित मुले-मुली, गर्भवती माता, अपघातग्रस्त व इतर रुग्णांना रक्त दिले जाते. त्यामुळे रक्ताची गरज जास्त प्रमाणात भासत असते. या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नंदुरबार पोलिस मुख्यालयात नंदुरबार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी रक्तदात्यांशी संवाद साधला. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एका रक्तदात्याच्या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळू शकते, असा संदेश देत त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला. मी आज रक्तदान केले तसे आपणाही स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी महिला रक्तदात्यांना केले. या वेळी प्रतिसाद देत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी पोलिस उपअधीक्षक अशोक कडलग, पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पोलिस निरीक्षक किसन राठोड, पोहवा रवींद्र पवार, पोहवा सचिन चव्हाण, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, गणेश पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. शिबिरात एकूण ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर संपल्यानंतर जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडेकर व इतर वैद्यकीय अधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे आभार मानले.